
नांदेड, 19 जून (हिं.स.)।
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी घरचे अथवा बाजारातून खरेदी केलेल्या बियाण्यांची पेरणीपूर्वी उगवण क्षमता तपासणी करूनच पेरणी करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.
यंदा अलनिनोच्या संभाव्य प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असल्याने उपलब्ध बियाण्यांची गुणवत्ता व उगवण क्षमता तपासणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
उगवण क्षमता चाचणीमुळे बियाण्याच्या दर्जाबाबत खात्री मिळते. तसेच संबंधित बियाणे पेरणीयोग्य आहे की नाही, हेही समजते. त्यामुळे आवश्यक बियाण्याचे प्रमाण निश्चित करता येते आणि प्रती एकर आवश्यक रोपसंख्या राखणे शक्य होते, असे जिल्हा अधिक्षक कृषिअधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी सांगितले. उगवण क्षमता आधीच तपासल्यामुळे निकृष्ट अथवा कमी उगवण असलेले बियाणे ओळखता येते. त्यामुळे नवीन बियाण्याची वेळेत व्यवस्था करून संभाव्य नुकसान टाळता येते. तसेच बियाण्यावर होणारा अनावश्यक खर्च वाचतो आणि दुबार पेरणीची वेळ येत नाही. चांगली उगवण झाल्यास शेतातील सर्व रोपे जवळपास एकाच वेळी उगवतात. परिणामी पिकाची वाढ, फुलोरा व परिपक्वता एकसमान होऊन पिकाची जोमदार वाढ होते.
अशी करा गोणपाट पद्धतीने उगवण क्षमता चाचणी-
बियाण्यातून १०० दाण्यांचा नमुना निवडा. हे दाणे ओल्या गोणपाटामध्ये व्यवस्थित गुंडाळा.
गोणपाट सावलीत किंवा उबदार ठिकाणी ठेवा. 4.6 ते 7 दिवस गोणपाट ओलसर राहील याची काळजी घ्या व अधूनमधून पाणी शिंपडा. निर्धारित कालावधीनंतर रुजलेल्या बियांची संख्या मोजा. ७० किंवा त्यापेक्षा अधिक बिया उगवल्यास संबंधित बियाणे पेरणीसाठी योग्य व दर्जेदार समजले जाते.
उगवण क्षमता तपासणीचे फायदे-
निकृष्ट व कमी उगवणक्षम बियाणे ओळखता येते. पर्यायी बियाण्याची वेळेत व्यवस्था करता येते. दुबार पेरणी व आर्थिक नुकसान टाळता येते. आवश्यक रोप संख्या राखणे शक्य होते.
पिकाची वाढ, फुलोरा व परिपक्वता एकसमान होते. उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांना अधिक आर्थिक लाभ मिळतो. बियाण्यावरील अनावश्यक खर्च टाळता येतो.
शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्याकडून पावतीसह बियाणे खरेदी करून पेरणीपूर्वी उगवण क्षमता चाचणी करावी” असे आवाहन दतकुमार कळसाईत, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी,नांदेड यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis