
रत्नागिरी, 19 जून (हिं.स.) । केंद्र व राज्य शासनाच्या विविध अर्थसाह्य योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी आपले डिजिटल लाइफ सर्टिफिकेट (DLC) अर्थात हयातीचे प्रमाणपत्र ३० जून २०२६ पूर्वी सादर करावे, असे आवाहन राजापूरच्या तहसीलदारांनी केले आहे.
ग्रामीण विकास मंत्रालयाने लाभार्थ्यांचे हयातीचे प्रमाणपत्र विनाशुल्क ऑनलाइन तयार करण्यासाठी Beneficiary Satyapan App विकसित केले आहे. या प्रणालीच्या माध्यमातून इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ अर्थसाह्य योजना, संजय गांधी योजना तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनांतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना हयातीचे प्रमाणपत्र ऑनलाइन सादर करता येणार आहे.
प्रमाणपत्रासाठी संबंधित लाभार्थ्यांचा आधार कार्ड व मोबाइल क्रमांक आवश्यक आहे. लाभार्थ्याकडे अँड्रॉइड मोबाइल उपलब्ध नसल्यास त्यांचे नातेवाईक किंवा अन्य व्यक्तीदेखील आपल्या मोबाइलमध्ये Aadhaar Face RD व Beneficiary Satyapan App डाउनलोड करून हयातीचे प्रमाणपत्र भरू शकतात.
ज्या लाभार्थ्यांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना ऑनलाइन प्रमाणपत्र तयार करताना अडचणी येत असतील, त्यांनी आपल्या गावातील संबंधित ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच राजापूर तहसील कार्यालयातील संजय गांधी शाखेत ३० जून २०२६ पूर्वी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी प्रत्यक्ष उपस्थित राहूनही हयातीचे प्रमाणपत्र सादर करता येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
शासनाच्या योजनांचा लाभ अखंडितपणे सुरू राहण्यासाठी सर्व पात्र लाभार्थ्यांनी मुदतीपूर्वी हयातीचे प्रमाणपत्र सादर करून महसूल प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार विकास गंबरे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी