
सोलापूर, 19 जून (हिं.स.)।
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींमध्ये वारकऱ्यांसाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाला ४ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीचे लवकरच ८१ ग्रामपंचायतींमध्ये वाटप करण्यात येणार आहे.
पुढील महिन्यांत आषाढी वारी होणार असून, दहा मानाच्या पालख्यांसह इतर पालख्या जिल्ह्यातील ८१ ग्रामपंचायतींमधून मार्गक्रमण करणार आहेत. या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांसाठी पाणी, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला पाच लाख ते सात ते दहा लाख रुपयांपर्यंत निधी देण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यासाठी एकूण ४.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून तो लवकरच संबंधित ग्रामपंचायतींना वितरित केला जाणार आहे.
यंदाही मोठ्या संख्येने वारकरी सहभागी होण्याची शक्यता असल्याने पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींनी आवश्यक सुविधा उभारण्यासाठी तातडीने कामे सुरू करावीत, असेही प्रशासनाकडून अपेक्षित आहे. निधी मिळाल्यानंतर ग्रामपंचायतींकडून विविध विकासकामांना गती दिली जाणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड