भीमाशंकर मंदिरात सकाळी ७ ते ११ विना ऑनलाइन नोंदणी थेट दर्शन
पुणे, 19 जून (हिं.स.)। श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर १५ जूनपासून पुन्हा भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. मात्र दर्शनासाठी ऑनलाइन नोंदणी व पास घेणे अनिवार्य केल्यामुळे सुरुवातीला भाविकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासना
Bhimasnakar


पुणे, 19 जून (हिं.स.)। श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर १५ जूनपासून पुन्हा भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. मात्र दर्शनासाठी ऑनलाइन नोंदणी व पास घेणे अनिवार्य केल्यामुळे सुरुवातीला भाविकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, दररोज सकाळी ७ ते ११ या वेळेत भाविकांना कोणतीही ऑनलाइन नोंदणी किंवा पासशिवाय थेट दर्शन घेता येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

मुख्य सभामंडप आणि पायाभूत सुविधांच्या कामांसाठी ९ जानेवारीपासून भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. काम पूर्ण झाल्यानंतर १५ जूनपासून मंदिर पुन्हा भाविकांसाठी खुले करण्यात आले. प्रारंभी दररोज केवळ एक हजार भाविकांनाच प्रवेश आणि त्यासाठी ऑनलाइन पास अनिवार्य करण्यात आला होता.

या व्यवस्थेमुळे पहिल्याच दिवशी भाविक आणि प्रशासन यांच्यात वाद निर्माण झाला होता. काही भाविकांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलनही केले होते. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आता नियम शिथिल करत भाविकांना दिलासा दिला आहे. १८ जूनपासून सकाळच्या वेळेत भीमाशंकर मंदिरात विना ऑनलाइन नोंदणी किंवा पास थेट दर्शन उपलब्ध होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande