
कोल्हापूर, 19 जून (हिं.स.)। केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार दि. 20 जून रोजी भव्य कार्यक्रम आयोजित केले आहेत. पश्चिम महाराष्ट्र विकास आराखड्यांतर्गत श्री महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिर परिसरातील नूतन प्रदक्षिणा मार्ग व परिवार देवता मंदिर संवर्धन कामकाजाचा शुभारंभ शनिवार, २० जून रोजी सकाळी होणार आहे. हा शुभारंभ याशिवाय जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा पोलीस परेड ग्राउंडवर होणार आहे. इचलकरंजी येथे जवाहर सह. साखर कारखान्याचा नामविस्तार कार्यक्रम होणार आहे.
अमित शाह यांचे कोल्हापूर येथे सकाळी 10.45 वाजता महालक्ष्मी अंबाबाई मंदिर येथे आगमन, दर्शन व राखीव. नंतर केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत महालक्ष्मी अंबाबाई मंदिर परिसराचे आधुनिकीकरण, सुशोभीकरण व पायाभरणी समारंभ स्थळ- महालक्ष्मी अंबाबाई मंदिर परिसर, केंद्र व राज्य सरकारने श्री अंबाबाई मंदिर परिवार विकासासाठी दिलेल्या भरघोस निधीबद्दल भाजपच्यावतीने पोलीस परेड ग्राउंडवर सकाळी 11 वाजता कृतज्ञता मेळावा होणार आहे. त्यानंतर दुपारी 3. 45 वाजता कल्लाप्पाण्णा आवाडे जनता सहकारी बँक लि. मेन रोड, इचलकरंजी येथे जवाहर सह. साखर कारखान्याच्या नामविस्तार कार्यक्रमास उपस्थिती, कल्लाप्पाण्णा आवाडे टेक्सटाईल पार्क मैदान, इचलकरंजी येथे सायं. 5 वाजता जाहीर सभा.होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती व करवीर निवासिनी श्री अंबाबाई विकास आराखडा अंतर्गत हा विकास प्रकल्प राबवला जात आहे. नवीन प्रदक्षिणा मार्गामुळे भाविकांना मंदिर प्रदक्षिणा करताना अधिक सुविधा, सुसज्जता आणि सुरक्षितता उपलब्ध होणार आहे. तसेच परिवार देवता मंदिरांचे संवर्धन व सुशोभीकरण केले जाणार आहे.
यावेळी, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांसह लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमानंतर केंद्रीय गृह व सहकार मंत्री यांची कोल्हापूर येथे राजकीय सभा तसेच इचलकरंजी येथे सहकारी बँकेचा कार्यक्रम व राजकीय सभा होणार आहे.
जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांच्याकडून पूर्वतयारीबाबत आढावा
जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी या दौऱ्याच्या अनुषंगाने प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या दौऱ्यात संबंधित अधिकाऱ्यांनी नेमूण दिलेली जबाबदारी अचूक पार पाडावी, याबाबतीत कोणतीही हयगय नको तसेच प्रत्येक ठिकाणी समन्वयाने कामकाज करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. या बैठकीला महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar