चंद्रपूरमध्ये ‘नीट’ (यूजी) परीक्षेसाठी प्रशासन सज्ज; कडक मार्गदर्शक सूचना जारी
चंद्रपूर, 19 जून (हिं.स.) : जिल्ह्यात ‘नीट’ (यूजी) परीक्षा 21 जून 2026 रोजी दुपारी 2 ते 5.15 या वेळेत जिल्ह्यातील 10 नियुक्त केंद्रांवर आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने उमेदवार व पालकांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी केल्या अ
चंद्रपूरमध्ये ‘नीट’ (यूजी) परीक्षेसाठी प्रशासन सज्ज; कडक मार्गदर्शक सूचना जारी


चंद्रपूर, 19 जून (हिं.स.) : जिल्ह्यात ‘नीट’ (यूजी) परीक्षा 21 जून 2026 रोजी दुपारी 2 ते 5.15 या वेळेत जिल्ह्यातील 10 नियुक्त केंद्रांवर आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने उमेदवार व पालकांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी केल्या असून, सर्वांनी त्यांचे काटेकोर पालन करून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

परीक्षा केंद्रांवर उमेदवारांना सकाळी 11 वाजल्यापासून प्रवेश दिला जाणार आहे. अंतिम प्रवेश वेळ दुपारी 1.30 पर्यंत निश्चित करण्यात आली असून त्यानंतर कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे उमेदवारांनी वेळेपूर्वी केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.उमेदवारांनी फोटो चिकटवलेले प्रवेशपत्र आणि मूळ वैध फोटो ओळखपत्र सोबत आणणे बंधनकारक आहे.प्रवेशद्वारावर कडक तपासणी व बायोमेट्रिक पडताळणी केली जाणार आहे. परीक्षा केंद्रात पालकांना प्रवेश दिला जाणार नाही. सर्व उमेदवारांनी अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे.

मोबाईल फोन, स्मार्ट वॉच, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, अभ्यास साहित्य, बॅग, कॅल्क्युलेटर यांसारख्या वस्तूंना पूर्णपणे बंदी आहे. तसेच दागिने, धातूची वस्तू, टोपी व अनावश्यक अ‍ॅक्सेसरीज वापरण्यास मनाई आहे. उमेदवारांनी साधे व हलके कपडे परिधान करावेत.पिण्याचे पाणी, वैद्यकीय मदत, अखंड वीजपुरवठा आणि सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. दिव्यांग उमेदवारांसाठी विशेष सुविधा तसेच वाहतूक व्यवस्थाही करण्यात आली आहे.उमेदवारांनी पुरेसे पाणी पिऊन व हलका आहार घेऊन केंद्रावर यावे. दीर्घकाळ उन्हात थांबणे टाळावे. पारदर्शक पाण्याची बाटली सोबत आणण्यास परवानगी देण्यात आली आहे.

प्रवेशपत्रावरील सर्व सूचना काळजीपूर्वक वाचून त्यांचे पालन करणे आवश्यक आहे. गर्दी टाळावी आणि प्रशासन व पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

--------------------------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande