
परभणी, 19 जून (हिं.स.)।
महाडीबीटी पोर्टलचे काम पूर्ण होताच योजनेच्या ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला सुरुवात होणार ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला बळ देणारी व पशुपालन व्यवसायाला उद्योजकतेचे आधुनिक स्वरूप देणारी ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना’ अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबविण्यासाठी पशुसंवर्धन विभाग कटिबद्ध आहे. महाआयटीकडून महाडीबीटी पोर्टलवर अर्ज प्राप्त करून घेण्यासाठी सुविधा निर्माण करण्याचे काम सुरू असून, हे काम पूर्ण होताच इच्छुक लाभार्थ्यांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येतील, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी दिली.
राज्यातील पशुसंवर्धन व्यवसायाला नवीन दिशा देण्यासाठी व ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील उद्योजकतेला चालना देणारी ही योजना राज्याच्या आर्थिक विकासात भरीव योगदान देणारी ठरणार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी राज्यातील युवावर्गासह शेतकरी व पशुपालकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर, योजनेची अंमलबजावणी वेळेवर व पारदर्शकपणे व्हावी, यासाठी पशुसंवर्धन विभागाने सूक्ष्म नियोजन सुरू केले आहे.
लाभार्थ्यांना घरातूनच सहज अर्ज करता यावा, यासाठी महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी महाआयटीकडे विशेष पोर्टल निर्मितीचे काम सोपविण्यात आले आहे. महाआयटीची तांत्रिक टीम हे पोर्टल लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहे. पोर्टलचे काम पूर्ण होताच, योजना अधिकृतपणे सुरू झाल्याची सूचना पशुसंवर्धन विभागामार्फत लवकरच जारी करण्यात येईल, असे आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेविषयी कोणतीही अधिकृत माहिती, शंका किंवा मार्गदर्शनासाठी इच्छुक लाभार्थ्यांनी ‘१९६२’ या टोल-फ्री कॉल सेंटर क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच, आपल्या परिसरातील नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्राशी संपर्क साधून माहिती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis