रत्नागिरी : कलारंग थिएटर्सतर्फे माचाळ येथे परिसर स्वच्छता
रत्नागिरी, 19 जून (हिं.स.) । लांजा येथील कलारंग थिएटर्स या नाट्य व सांस्कृतिक संस्थेने लांजा तालुक्यातील मिनी महाबळेश्वर असलेल्या माचाळ या पर्यटनस्थळी स्वच्छता व साफसफाई करून स्वच्छतेचा संदेश दिला. पावसाळा सुरू होत असून माचाळमध्ये मोठ्या प्रमा
कलारंग संस्थेतर्फे माचाळला स्वच्छता अभियान


रत्नागिरी, 19 जून (हिं.स.) । लांजा येथील कलारंग थिएटर्स या नाट्य व सांस्कृतिक संस्थेने लांजा तालुक्यातील मिनी महाबळेश्वर असलेल्या माचाळ या पर्यटनस्थळी स्वच्छता व साफसफाई करून स्वच्छतेचा संदेश दिला.

पावसाळा सुरू होत असून माचाळमध्ये मोठ्या प्रमाणात रत्नागिरी जिल्ह्यासह मुंबई, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग या भागातून असंख्य पर्यटक वर्षासहलीचा आनंद घेण्यासाठी येत असतात. थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माचाळमध्ये पर्यटक दाखल होत आहेत. यावर्षी उन्हाळ्यात कडाक्याचे ऊन असतानाही पर्यटक माचाळकडे दाखल झाले होते. सह्याद्रीचे डोंगरकडे, थंड वारा, नागमोडी वळणे, नजरेस पडणारे पशु-पक्षी, पक्ष्यांचे आवाज, गडद वनराई या निसर्गसौंदर्याची अनुभूती घेण्यासाठी माचाळ पर्यटनाला नागरिकांची गर्दी होत असते. त्यामुळे परिसर अस्वच्छही होत असतो.

माचाळमधील अस्वच्छता लक्षात घेऊन लांजा येथील कलारंग थिएटर्सने निसर्गसहल व माचाळ परिसर स्वच्छता असा उपक्रम राबविला. स्वच्छता उपक्रमात सहभागी झालेल्या संस्थेच्या सर्व सदस्यांनी माचाळमधील महत्त्वाच्या सर्व ठिकाणी साफसफाई करून परिसर स्वच्छ केला. जुन्या काळातील पाणवठ्याची स्वच्छता केली. पर्यटकांनी टाकलेल्या प्लास्टिक बाटल्या, काचेच्या बाटल्या, प्लास्टिक कागद, पालापाचोळा गोळा केला. त्यामुळे परिसर स्वच्छ झाला. या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande