
नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची २२ जून रोजी होणार मतमोजणी
नाशिक, 19 जून (हिं.स.)। महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी गुरुवार १८ जून २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीची मतमोजणी सोमवार २२ जून २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक निरीक्षक मिलिंद शंभरकर, निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत आज मतमोजणीचे प्रात्यक्षिक, प्रशिक्षण कार्यक्रम झाला.
जिल्हाधिकारी कार्यालयात मतमोजणी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक मधुमती सरदेसाई, तहसीलदार पंकज पवार, प्रकाश महाजन यांच्यासह मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी एकूण तीन उमेदवार निवडणूक रिंगणात होते. एकूण ६१९ मतदारांसाठी जिल्ह्यातील नऊ मतदान केंद्रांवर मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. सकाळी ८ ते दुपारी ४ या कालावधीत मतदानाची प्रक्रिया पार पडली. एकूण ६१८ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर आज जिल्हाधिकारी कार्यालयात मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी मतमोजणी प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. मतमोजणीसाठी एकूण चार टेबल असतील. प्रत्येक टेबलवर मतमोजणीसाठी तहसीलदार आणि नायब तहसीलदार दर्जाचे अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.
निवडणूक निर्णय अधिकारी श्री. प्रसाद यांनी सांगितले की, मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार मतमोजणी करावयाची आहे. त्यासाठी उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी सूक्ष्म नियोजन करावयाचे आहे. यावेळी मतमोजणीसाठी सुरू असलेल्या तयारीची माहिती देण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV