
पुणे, 19 जून (हिं.स.)। दौंड तालुक्यात गर्भलिंग निदान रॅकेट उघडकीस आल्यानंतर आरोग्य विभागाने केवळ गुन्हे दाखल करण्यावर न थांबता संपूर्ण तालुक्यात व्यापक तपासणी मोहीम राबवली आहे. जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आणि पोलिस यंत्रणेच्या समन्वयातून बेकायदा गर्भलिंग निदान व गर्भपात प्रकरणांवर कठोर कारवाई सुरू करण्यात आली असून, बुधवारपर्यंत ११ खासगी रुग्णालयांवर ‘बॉम्बे नर्सिंग होम ॲक्ट’ अंतर्गत कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे मंडळ आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांनी ४ जून रोजी दौंड उपजिल्हा रुग्णालय व पंचायत समिती कार्यालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र (PCPNDT) अधिनियम तसेच वैद्यकीय गर्भपात अधिनियम अंतर्गत विशेष तपासणी मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
या मोहिमेसाठी पुणे जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरारी पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी ५ आणि ६ जून रोजी दौंड शहरासह तालुक्यातील विविध खासगी आरोग्य संस्थांची तपासणी केली. या कारवाईत एकूण ६४ आरोग्य संस्थांची तपासणी करण्यात आली असून त्यात २५ सोनोग्राफी केंद्रे, २० गर्भपात केंद्रे आणि १९ नर्सिंग होम यांचा समावेश आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु