
छत्रपती संभाजीनगर, 19 जून (हिं.स.)।
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) तर्फे राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील तसेच अमृतच्या लक्षित गटातील उमेदवारांसाठी संघ लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) नागरी सेवा मुख्य परीक्षा व मुलाखत पूर्वतयारीसाठी प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य योजना सन 2026-27 मध्ये राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.
अमृतच्या लक्षित गटामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी, मारवाडी, पाटील, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, वैश्य, नायर, नायडू, कम्मा, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुंथर, गुजराती, जाट, हिंदू नेपाळी, भूमिहार, लोहारणा, कानबी आदी समाजघटकांचा समावेश आहे.
सन 2026-27 मध्ये संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा पूर्व परीक्षा-2026 मध्ये उत्तीर्ण झालेल्या आणि या योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक असलेल्या पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावेत. अर्ज भरण्यापूर्वी संबंधित सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करून त्यानुसार अर्ज सादर करावा.
योजनेअंतर्गत पात्र उमेदवारांना नागरी सेवा मुख्य परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी 50 हजार रुपये इतके प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. तसेच मुलाखत फेरीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना मुलाखत पूर्वतयारीसाठी 25 हजार रुपये इतके अर्थसहाय्य प्रदान करण्यात येणार आहे.
ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी अमृतच्या https://mahaamrut.org.in/ या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा.
योजनेबाबतची पुढील सर्व माहिती, सूचना व अद्यतने केवळ अमृतच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी अथवा ऑनलाइन अर्ज भरण्याबाबत काही अडचण अथवा शंका असल्यास संबंधित जिल्हा अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा.
ऑनलाइन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 17 जुलै 2026 असून पात्र उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis