
नांदेड, 19 जून (हिं.स.)।
सगरोळी येथील एका साध्या कुटुंबातील माधवीने जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाच्या बळावर स्वावलंबनाचा नवा आदर्श निर्माण केला आहे. चार बहिणींमधील मोठी असलेली माधवीची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत नाजूक होती. तिचे वडील सातारा जिल्ह्यातील कराड येथील औद्योगिक क्षेत्रात एका कंपनीत हेल्पर म्हणून काम करतात, तर आई शेतमजुरी करून कुटुंबाला हातभार लावते. आई आणि चारही मुली सगरोळी येथील एका छोट्या वस्तीत भाड्याच्या घरात राहतात.
माधवी आणि तिच्या बहिणी संस्कृति संवर्धन मंडळ संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये शिक्षण घेत आहेत. अभ्यासात हुशार असलेल्या माधवीसमोर दहावीनंतर पुढील शिक्षणाचा प्रश्न उभा राहिला होता. विज्ञान शाखेचे शिक्षण आणि त्यासाठी लागणारा खर्च कुटुंबासाठी परवडणारा नव्हता. अशा परिस्थितीत तिने संस्थेच्या व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमात प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला.
सन २०२४ मध्ये बारावी उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर संस्थेच्या पुढाकारातून पुणे येथील सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेशासाठी तिची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत तिची निवड झाली आणि अॅडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी तिचा प्रवेश निश्चित झाला. निवास, भोजन आणि प्रशिक्षणासह संपूर्णतः मोफत असलेल्या या तीन वर्षांच्या अभ्यासक्रमाने तिच्या आयुष्याला नवी दिशा दिली.
इंग्रजी भाषेची सुरुवातीला भीती वाटत असली तरी माधवीने चिकाटी, आत्मविश्वास आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केला. नुकतेच दीड वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुण्यातील फ्लॅश ऑटोमोबाईल्स कंपनीत तिची इंटर्नशिपसाठी निवड झाली. आज ती दरमहा १८ हजार रुपये मानधन मिळवत आहे.
पहिल्या मानधनातून खरेदी केलेले पेढे घेऊन माधवी आपल्या पालकांसह शाळेत आली होती. यावेळी तिच्या यशाबद्दल बोलताना पालकांच्या चेहऱ्यावरचा अभिमान स्पष्ट दिसत होता. “शाळेने आणि संस्थेने या कोर्समध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले नसते तर आम्ही कदाचित तिचे लग्न लावून दिले असते. आज ती स्वतःचे शिक्षण पूर्ण करत आहेच, पण कुटुंबाचा आणि लहान बहिणींच्या शिक्षणाचा मोठा आधार बनली आहे,” असे तिच्या पालकांनी सांगितले.
माधवीच्या यशामुळे प्रेरित होऊन सध्या बारावीमध्ये शिकणाऱ्या दुसऱ्या मुलीलाही अशाच प्रकारे आत्मनिर्भर बनवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
व्यवसाय शिक्षण विभागाचे अशोक मिद्दलवार यांनी सांगितले की, या उपक्रमांतर्गत २०२४ मध्ये ६ मुली , २०२५ मध्ये ८ मुली आणि एप्रिल २०२६ मधील प्रवेश प्रक्रियेत तब्बल २४ गरजू मुलींची निवड झाली आहे. या यशामागे संस्थेच्या शिक्षण समन्वयिका श्रद्धा देशमुख यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन महत्त्वाचे ठरल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच लवकरच ग्रामीण भागातील गरजू मुलांसाठीही अशाच प्रकारचा उपक्रम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. श्रद्धा देशमुख, विभाग प्रमुख साहेबराव भिसे, निदेशक श्याम मोरे, श्रीमती मयूरी पाटील यांनी तिचे संस्थेच्या वतीने कौतुक केले.
माधवीचे अथक परिश्रम, पालकांचे पाठबळ आणि संस्कृति संवर्धन मंडळ संस्थेचे योग्य मार्गदर्शन यामुळे एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी आज स्वावलंबनाच्या दिशेने यशस्वी वाटचाल करत आहे. तिची ही प्रेरणादायी यशोगाथा ग्रामीण भागातील अनेक मुलींसाठी आशेचा किरण ठरत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis