
हिंगोली, 19 जून (हिं.स.)।
योगाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैली, मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक तंदुरुस्तीचा संदेश समाजात पोहोचविण्याच्या उद्देशाने 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त हिंगोली येथे भव्य योग दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संत नामदेव पोलीस कवायत मैदान येथे सकाळी 7 वाजता होणारा हा कार्यक्रम जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शिक्षण विभाग आणि जिल्हा योग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील नागरिक, विद्यार्थी, युवक, क्रीडापटू, योगप्रेमी, स्वयंसेवी संस्था तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी सहभागी होणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी जिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांनी केले आहे.
कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत विविध विभागांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या. कार्यक्रमाचे नियोजन, सुविधा आणि विभागांतील समन्वय याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीस माध्यमिक शिक्षणाधिकारी विपुल भागवत, प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर, शासकीय तंत्रनिकेतनचे मुकेश सामलेटी, स्काऊट गाईडच्या जिल्हा संघटक माधुरी दळवी, योग विद्या धामचे रत्नाकर महाजन, पतंजली योग समितीचे विठ्ठल सोळुंके तसेच विविध योग संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी निवासी जिल्हाधिकारी बोधवड यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वय साधून सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. योगाचा संदेश गावपातळीपर्यंत पोहोचविण्यासाठी शिक्षण विभागाने विशेष पुढाकार घ्यावा, असे निर्देशही त्यांनी दिले. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये योग दिन साजरा करण्यासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.
कार्यक्रमासाठी आसन व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सुविधा, सहभागी नागरिक व विद्यार्थ्यांच्या बसण्याची व्यवस्था, प्रवेशद्वार आणि इतर आवश्यक सुविधांबाबत क्रीडा विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच योगाचार्य आणि योग संघटनांच्या प्रतिनिधींनी कार्यक्रम अधिक प्रभावी व व्यापक करण्यासाठी विविध सूचना मांडल्या.
जिल्हास्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या या योग दिन कार्यक्रमातून नागरिकांमध्ये योगाविषयी जागरूकता निर्माण होऊन निरोगी जीवनशैलीचा संदेश अधिक व्यापकपणे पोहोचेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis