
छत्रपती संभाजीनगर, 19 जून (हिं.स.) :मराठा समाजातील नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र तसेच ऑनलाइन कुणबी नोंदी शोधण्याबाबत मदत व मार्गदर्शन मिळावे यासाठी जालना जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष हेल्पलाईन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत.
शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या 7 सप्टेंबर 2023 च्या शासन निर्णयासह सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 2 सप्टेंबर 2025 च्या निर्णयाच्या अनुषंगाने ही कार्यवाही करण्यात आली आहे. तसेच विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांच्या निर्देशांनुसार जिल्हा स्तरावर आवश्यक उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
समित्या व प्रक्रिया अधिक गतिमान
मराठा–कुणबी, कुणबी–मराठा आणि कुणबी जात प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेसाठी मा. न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. या प्रक्रियेला गती देण्यासाठी गावपातळीवर ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.
नव्या आदेशानुसार, ज्या नागरिकांकडे जमिनीचे पुरावे उपलब्ध नाहीत त्यांनी 13 ऑक्टोबर 1967 पूर्वी किंवा नंतर संबंधित परिसरात वास्तव्यास असल्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे. या आधारावर स्थानिक चौकशी करून पात्रतेची पडताळणी केली जाणार आहे.
हेल्पलाईन कक्षातून मार्गदर्शन
नागरिकांना प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात हेल्पलाईन कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षामार्फत कुणबी नोंदी शोधणे, अर्ज प्रक्रिया, ऑनलाइन नोंदींचा वापर आणि जात पडताळणीबाबत मार्गदर्शन दिले जाणार आहे.
या कक्षासाठी खालील अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत:
• किशोर तायडे – नायब तहसीलदार (महसूल)
• अशोक झळके – महसूल सहाय्यक
नागरिकांनी कुणबी जात प्रमाणपत्र व संबंधित माहितीकरिता 02482-223132 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis