हिंजवडी–शिवाजीनगर मार्गावर मेट्रो सेवा लवकरच; टप्प्याटप्प्याने उद्घाटनाची शक्यता
पुणे, 19 जून, (हिं.स.)। हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो मार्गावरील माण ते आर. के. लक्ष्मण संग्रहालय या १३.३ किलोमीटर अंतरातील १२ स्थानकांचे काम जूनअखेरपर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती ‘पुणे आयटी सिटी मेट्रो रेल’चे (पीआयटीसीएमआरएल) मुख्य कार्यकारी अधिकार
Metro Train


पुणे, 19 जून, (हिं.स.)। हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो मार्गावरील माण ते आर. के. लक्ष्मण संग्रहालय या १३.३ किलोमीटर अंतरातील १२ स्थानकांचे काम जूनअखेरपर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती ‘पुणे आयटी सिटी मेट्रो रेल’चे (पीआयटीसीएमआरएल) मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कुमार सैनी यांनी दिली आहे. या मार्गाच्या उद्घाटनाचा आणि प्रवासी सेवा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सैनी यांच्या म्हणण्यानुसार, पहिल्या टप्प्यात मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात चार ते पाच स्थानके प्रवाशांसाठी खुली करण्यात येतील. काही मधली स्थानके वगळून जिल्हा न्यायालयापर्यंत सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. दुसऱ्या टप्प्यातील काही स्थानकांचे बांधकाम पूर्ण झाले असून किरकोळ कामे शिल्लक आहेत, जी ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

डिसेंबरअखेरपर्यंत रेंजहिल्स आणि शिमला ऑफिस ही दोन स्थानके वगळता इतर सर्व स्थानकांची कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या दोन्ही स्थानकांच्या बांधकामासाठी गणेशखिंड रस्ता दिवसा बंद करणे शक्य नसल्याने आणि वाहतूक वळवणे कठीण असल्याने रात्री काम करावे लागत आहे. त्यामुळे कामाच्या गतीवर मर्यादा येत असल्याचे त्यांनी सांगितले.

ही दोन स्थानके मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असून, पीएमआरडीएने जुलै २०२७ पर्यंत मुदतवाढ मागितली असली तरी सर्व कामे त्यापूर्वीच पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे सैनी यांनी स्पष्ट केले. यावेळी पीआयटीसीएमआरएलचे मुख्य वृत्त अधिकारी मितूल जव्हेरी आणि मुख्य कार्यकारी व्यवस्थापक पराग पहूरकर उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande