राज्यमंत्री बोर्डीकर यांच्या मतदारसंघात दूषित पाणीपुरवठा ? नागरिकांचे आरोग्य धोक्यात, नगरपरिषदेचे दुर्लक्ष
परभणी, 19 जून (हिं.स.)। जिंतूर नगरपरिषदेमार्फत करण्यात येत असलेल्या पाणीपुरवठ्यात काही प्रभागात गाळमिश्रित आणि दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, परिसरात विविध आजारांची भीती निर्माण झाली आहे. जिंतूर शहरामध्ये गेल्या काही दिवसांपा
Q


परभणी, 19 जून (हिं.स.)।

जिंतूर नगरपरिषदेमार्फत करण्यात येत असलेल्या पाणीपुरवठ्यात काही प्रभागात गाळमिश्रित आणि दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, परिसरात विविध आजारांची भीती निर्माण झाली आहे. जिंतूर शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून काही प्रभागात नळांना गाळमिश्रित, पिवळसर आणि दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याचे नागरीकांचे म्हणणे आहे. याबाबत नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

जलवाहिनीतील गळती किंवा पाणीपुरवठा यंत्रणेतील बिघाडामुळे नळांना थेट मैला युक्त आणि गाळ मिश्रित पाणी येत आहे. यामुळे थेट आरोग्यावर परिणाम होत असून लहान मुले आणि वृद्धांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. शुद्ध पाण्यासाठी लोकांना जारचे पाणी विकत घ्यावे लागत असून सर्वसामान्यांवर आर्थिक भुर्दंड पडत आहे. स्थानिक नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाकडे वारंवार तोंडी तक्रारी केल्या आहेत. परंतु, प्रशासनाकडून केवळ ‘दुरुस्ती सुरू आहे’ असे आश्वासन दिले जात आहे. अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नागरिक आता आंदोलनाचा पावित्र्यात असल्याचे समजत आहे.

दरम्यान, नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांची तपासणी करून मुख्य जलवाहिन्या फुटल्या आहेत का, याची शोधमोहीम घेऊन दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिक करीत आहे.

दूषित पाणी पिल्यामुळे जिंतूर शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होणार असून परिसरात गॅस्ट्रो, डायरिया आणि पोटाच्या विकारांचे रुग्ण वेगाने वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाणीपुरवठा व आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी याकडे लक्ष देऊन नागरिकांना नियमितपणे स्वच्छ आणि शुद्ध पाणी देण्यास प्रयत्न करावे अशी नागरिक चर्चा करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande