
लातूर, 19 जून (हिं.स.)।
: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित ‘महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा २०२६’ (TET) रविवार, २८ जून रोजी पार पडणार आहे. लातूर जिल्ह्यातील एकूण ४१ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार असून, परीक्षेची शुचिता आणि शांतता राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी गंभीर दखल घेत परीक्षा केंद्रांच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
दोन सत्रांत होणार परीक्षा
शिक्षक पात्रता परीक्षा दोन सत्रांमध्ये पार पडणार आहे. पहिले सत्र सकाळी १०.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत, तर दुसरे सत्र दुपारी २.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत असेल. या काळात परीक्षार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये आणि परीक्षा सुरळीत पार पडावी, यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत.
प्रतिबंधात्मक आदेशाचे प्रमुख मुद्दे:
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, २८ जून रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत खालील बाबींवर बंदी असेल:
जमावबंदी: परीक्षा केंद्राच्या परिसरात पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई आहे.
व्यावसायिक आस्थापने बंद: परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर्स, पानटपरी, टायपिंग सेंटर, एसटीडी बूथ आणि ध्वनिक्षेपक पूर्णपणे बंद राहतील.
इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर बंदी: परीक्षा केंद्राच्या परिसरात मोबाईल फोन, सेल्युलर फोन, ई-मेल किंवा कोणतीही इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमे नेण्यास सक्त मनाई आहे.
इतर निर्बंध: परिसरात घोषणाबाजी करण्यास किंवा शांततेस बाधा पोहोचेल असे कृत्य करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच अनधिकृत व्यक्ती आणि वाहनांच्या प्रवेशावरही निर्बंध असतील.
कोणाला असणार सूट?
हे प्रतिबंधात्मक आदेश केवळ परीक्षार्थी आणि सामान्य नागरिकांसाठी आहेत. परीक्षा केंद्रावर तैनात असलेले संबंधित अधिकारी, कर्मचारी, निगराणी करणारे अधिकारी आणि पोलीस यंत्रणेतील अधिकारी-कर्मचारी यांना त्यांचे कर्तव्य पार पाडण्यासाठी या आदेशातून सवलत देण्यात आली आहे.
परीक्षेच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाने चोख व्यवस्था केली असून, परीक्षार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांततेत परीक्षा द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis