टीईटी परीक्षा २८ जूनला; २८,२९८ उमेदवार रिंगणात
सोलापूर, 19 जून (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने रविवारी (दि. २८ जून) शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेला जिल्ह्यातील एकूण २८,२९८ परीक्षार्थी बसणार असून त्यांची बायोमेट्रिक तपासणी करण्यात येणार आह
tet


सोलापूर, 19 जून (हिं.स.)।

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने रविवारी (दि. २८ जून) शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेला जिल्ह्यातील एकूण २८,२९८ परीक्षार्थी बसणार असून त्यांची बायोमेट्रिक तपासणी करण्यात येणार आहे.

शहर व परिसरातील ४७ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पडणार आहे. परीक्षा सुरळीत, पारदर्शक आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाने दिली आहे.

टीईटी परीक्षेचा पेपर-१ (इयत्ता पहिली ते पाचवी) आणि पेपर-२ (इयत्ता सहावी ते आठवी) असे दोन विभाग असणार आहेत. पेपर-१ साठी १२,२६१ तर पेपर-२ साठी १६,०३७ उमेदवारांनी नोंदणी केली असून एकूण २८,२९८ परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत.

परीक्षार्थींनी सोबत मूळ फोटो ओळखपत्र व त्याची छायाप्रत बाळगणे आवश्यक आहे. मोबाईल, स्मार्टवॉच, ब्लूटूथ, डिजिटल घड्याळ किंवा इतर कोणतेही इलेक्ट्रॉनिक साहित्य परीक्षा केंद्रात नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

बायोमेट्रिक उपस्थिती आणि तपासणी प्रक्रियेमुळे परीक्षार्थींनी वेळेआधी केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. पेपर-१ साठी सकाळी ८.३० वाजता आणि पेपर-२ साठी दुपारी १२.३० वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सकाळी १०.१० नंतर आणि दुपारी २.१० नंतर कोणालाही परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande