
सोलापूर, 19 जून (हिं.स.)। माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी परिसरात 14 जून 2026 रोजी घडलेल्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा रस्ते सुरक्षा समितीचे अध्यक्ष यांनी विशेष चौकशी समिती गठीत केली आहे. या अपघातात म्हसवड येथील श्री सिद्धनाथ दर्शनाहून परतणाऱ्या भाविकांची पिकअप वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या उघड्या विहिरीत कोसळून आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
या गंभीर घटनेची सखोल चौकशी करून अपघाताचे नेमके कारण—रस्त्याची रचना, वाहनाचा वेग किंवा अन्य तांत्रिक बाबी—याचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशी समिती आपला अहवाल जिल्हा रस्ते सुरक्षा समितीकडे सादर करणार असून त्यानुसार पुढील कायदेशीर व सुधारात्मक कारवाई केली जाणार आहे.
भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी जिल्ह्यातील रस्त्यांच्या कडेला असलेल्या संरक्षक भिंत नसलेल्या धोकादायक विहिरींचे तात्काळ सर्वेक्षण करण्यासाठी तालुकास्तरीय समितीही स्थापन करण्यात आली आहे.
या समितीला महामार्ग, राज्य महामार्ग आणि ग्रामीण रस्त्यांलगतच्या उघड्या विहिरींची यादी तयार करणे, संबंधित मालकांना संरक्षक भिंत, लोखंडी जाळ्या किंवा धोकादर्शक फलक बसवण्याचे आदेश देणे तसेच आदेशांचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना अपर जिल्हादंडाधिकारी अभिजीत पाटील यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करत, नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल आणि जिल्ह्यातील सर्व धोकादायक विहिरी सुरक्षित केल्या जातील, असे स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड