राज्यात ६ लाखांहून अधिक अर्ज; टीईटी परीक्षेसाठी मोठी तयारी
पुणे, 19 जून, (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी ‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२६’ यंदा २८ जून रोजी राज्यभरात आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी राज्यातील सुमारे दोन लाख २६ हजार २६३ शिक्षक परीक्षा देणार
tet


पुणे, 19 जून, (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी ‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२६’ यंदा २८ जून रोजी राज्यभरात आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी राज्यातील सुमारे दोन लाख २६ हजार २६३ शिक्षक परीक्षा देणार असून, एकूण ४ लाख २८ हजार १२२ परीक्षार्थींनी नोंदणी केली आहे. पेपर एक आणि पेपर दोन मिळून एकूण ६ लाख १२५ अर्ज प्राप्त झाले आहेत.

राज्यातील जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी एकूण १,७२९ परीक्षा केंद्रांवर परीक्षा होणार आहे. यामध्ये पेपर एकसाठी ७०१ केंद्रे आणि पेपर दोनसाठी १,०२८ केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी वर्गखोल्या, प्रवेशद्वार, लॉबी आणि केंद्र संचालक कक्ष अशा ठिकाणी एकूण १८,७१७ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.

नोंदणी आकडेवारीनुसार, १,९०,६६९ पुरुष, २,३७,४४८ महिला आणि ५ तृतीयपंथी उमेदवार परीक्षेला बसणार आहेत. तसेच ७,१३९ दिव्यांग उमेदवारांचाही यात समावेश आहे.

या संदर्भात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे आणि आयुक्त महेश चोथे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, टीईटी परीक्षा शिक्षक भरती प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावते आणि यंदा मोठ्या प्रमाणात उमेदवार सहभागी होत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande