
परभणी, 19 जून (हिं.स.)।
तालुक्यातील मौजे टाकळी (कुंभकर्ण) येथील सन १९९० पासून प्रलंबित असलेले प्लॉट फेरफार प्रकरण अखेर निकाली निघाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. तब्बल ३५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नाला न्याय मिळाल्याबद्दल ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले तसेच महसूल प्रशासनाचे आभार व्यक्त केले.
ग्रामस्थांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी संबंधित प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी विशेष बैठक घेऊन ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतले व प्रकरण निकाली काढण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू केली.
तहसीलदार डॉ. संदीप राजपुरे, नायब तहसीलदार मधुकर शिरसागर, ग्राम महसूल अधिकारी सोपान गुंडे तसेच मंडळ अधिकारी ज्योती अडगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि समन्वयातून प्रलंबित फेरफार प्रकरण निकाली काढण्यात आले. यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नाचा मार्ग मोकळा झाला असून संबंधित लाभधारकांना न्याय मिळाला आहे.
या पार्श्वभूमीवर टाकळी (कुंभकर्ण) येथील ग्रामस्थांच्या वतीने महसूल प्रशासनाचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी विशेषतः जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या सकारात्मक हस्तक्षेपाबद्दल तसेच महसूल विभागाच्या तत्पर व लोकाभिमुख कार्यपद्धतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी ग्रामस्थांनी सांगितले की, फेरफार प्रकरणासाठी गेली ३५ वर्षे संघर्ष सुरू होता. अखेर माननीय जिल्हाधिकारी व महसूल प्रशासनाच्या पुढाकारामुळे हा दीर्घकालीन प्रश्न मार्गी लागला असून ग्रामस्थांना न्याय मिळाला आहे. त्यामुळे संपूर्ण गावकऱ्यांनी समाधान व्यक्त करत संबंधित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis