राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम; जिल्हास्तरीय टास्क फोर्स समितीची बैठक संपन्न
छत्रपती संभाजीनगर, 19 जून (हिं.स.)। जिल्ह्यात 28 जून 2026 रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असून शून्य ते पाच वर्षे वयोगटातील एकही बालक पोलिओ डोसपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप
अ


छत्रपती संभाजीनगर, 19 जून (हिं.स.)।

जिल्ह्यात 28 जून 2026 रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असून शून्य ते पाच वर्षे वयोगटातील एकही बालक पोलिओ डोसपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 2026 च्या अनुषंगाने जिल्हास्तरीय टास्क फोर्स समितीची बैठक जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल, सहायक संचालक (कुष्ठरोग) डॉ. राहुल गीते, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र पुरी, जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात शून्य ते पाच वर्षे वयोगटातील एकूण 1 लाख 23 हजार 956 बालकांना पोलिओचा डोस देण्याचे उद्दिष्ट असून यासाठी 1 हजार 202 बुथ उभारण्यात येणार आहेत. बसस्थानके, रेल्वे स्थानके, चेकपोस्ट आणि साखर कारखान्यांवर ट्रांझिट टीममार्फत, तर वीटभट्ट्या व पालांवर मोबाईल टीममार्फत बालकांना पोलिओ डोस देण्यात येणार आहे. मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर पर्यवेक्षण अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पालकांनी आपल्या शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना दि. 28 जून रोजी जवळच्या पोलिओ बुथवर घेऊन जाऊन पोलिओचा डोस पाजावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले. तसेच आरोग्य, महिला व बालविकास आणि शिक्षण विभागांनी समन्वयाने काम करून मोहिमेची व्यापक जनजागृती करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande