
लातूर, 19 जून (हिं.स.)। महावितरण कंपनीच्या संचालक (संचालन) पदाचा कार्यभार धनंजय औंढेकर यांनी स्वीकारला. थेट भरती प्रक्रियेद्वारे त्यांची या पदावर निवड करण्यात आली असून यापूर्वी ते कार्यकारी संचालक (वितरण/प्रकल्प) म्हणून कार्यरत होते. महावितरणमध्ये जवळपास २९ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या औंढेकर यांच्याकडे आता कंपनीच्या संचालनाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
मूळचे हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील असलेल्या धनंजय औंढेकर यांनी विद्युत अभियांत्रिकी पदवीसह एमबीए (फायनान्स), एनर्जी ऑडिटर आणि नवी दिल्ली येथील पॉवर डिस्ट्रीब्युशन मॅनेजमेंटमधील अॅडव्हान्स सर्टिफिकेट अभ्यासक्रम विशेष प्रावीण्यासह पूर्ण केला आहे.
सन १९९७ मध्ये तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात कनिष्ठ अभियंता म्हणून बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे त्यांनी सेवेला सुरुवात केली. त्यानंतर २००६ मध्ये थेट निवड प्रक्रियेतून कार्यकारी अभियंता, २०१६ मध्ये अधीक्षक अभियंता आणि २०१९ मध्ये पदोन्नतीद्वारे मुख्य अभियंता पदावर त्यांची नियुक्ती झाली. सेवाकाळात त्यांनी बीड, परभणी, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, सोलापूर, कल्याण तसेच मुंबई मुख्यालयात विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या.
२०२४ पासून कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत असताना त्यांच्या नेतृत्वाखाली महावितरणने ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेत देशात प्रथम क्रमांक पटकावला. एकाच महिन्यात ४५ हजार ९११ सौर कृषिपंप कार्यान्वित करण्याचा विक्रमही महावितरणने नोंदविला असून त्याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
तसेच प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत घरावरील सौर ऊर्जा प्रकल्पांच्या अंमलबजावणीत महावितरणने देशात दुसरे स्थान मिळविले. या योजनेसाठी देशातील पहिली फेसलेस-पेपरलेस ऑनलाइन सुविधा सुरू करण्यासह नवीन वीजजोडणी, ग्राहकांच्या नावातील बदल आणि वीजभार वाढीसाठी स्वयंचलित मंजुरी प्रणाली सुरू करण्यातही त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे.
कार्यभार स्वीकारल्यानंतर बोलताना धनंजय औंढेकर यांनी सांगितले की, अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला आणि महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली कंपनीला अधिक सक्षम, ग्राहकस्नेही आणि हरित ऊर्जेकडे नेण्यासाठी प्राधान्य दिले जाईल. नवीन वीजजोडणीची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन करण्यात येणार असून सुरळीत वीजपुरवठा, दर्जेदार ग्राहकसेवा, वीज हानीत घट आणि महसूलवाढ ही प्रमुख उद्दिष्टे राहतील.
महावितरणच्या संचालन क्षेत्रातील अनुभवी अधिकारी म्हणून ओळख असलेल्या धनंजय औंढेकर यांच्या नियुक्तीमुळे कंपनीच्या विविध प्रकल्पांना अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis