
पुणे, 19 जून (हिं.स.)। पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृत वृक्षतोड रोखण्यासाठी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात यावी, तसेच मंजूर वृक्षतोड प्रकरणांतील पुनर्रोपणाची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात यावी, असे आदेश महापौर रवी लांडगे यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत. वृक्ष प्राधिकरण समितीच्या निर्णयांमध्ये पर्यावरण संवर्धनाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देशही त्यांनी दिले असून, वृक्षतोड, पुनर्रोपण आणि कारवाईची माहिती नागरिकांसाठी पारदर्शकपणे उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे.
महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्षांचे संरक्षण व संवर्धन अधिनियमानुसार दोषींवर कठोर कारवाई करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
मागील सहा वर्षांत विकासकामांच्या नावाखाली शहरातील २१,३३८ झाडांवर वृक्षतोड करण्यात आली असून, त्यापैकी ९,१९५ झाडांचे पुनर्रोपण करण्यात आले आहे. तसेच मागील सात वर्षांत ९ लाखांहून अधिक झाडे लावल्याचा दावा प्रशासनाने केला असला तरी त्यातील किती झाडे टिकली याबाबत स्पष्ट माहिती उद्यान विभागाकडे उपलब्ध नाही.
या पार्श्वभूमीवर महापौर लांडगे यांनी वृक्षतोडीच्या वाढत्या घटनांवर कठोर भूमिका घेतली आहे. शहरात यावर्षी पाच लाख वृक्ष लागवड व संवर्धनाचे महत्त्वाकांक्षी अभियान राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
नवीन वृक्ष लागवडीबरोबरच विद्यमान वृक्षसंपदा जपणे आवश्यक असल्याचे नमूद करताना, तापमानवाढ, वायू प्रदूषण आणि हवामान बदल लक्षात घेऊन वृक्षतोडीस परवानगी देताना अत्यंत काळजी घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
हरित पिंपरी-चिंचवड हे केवळ अभियान नसून भविष्यातील पिढ्यांसाठी स्वच्छ, हरित आणि पर्यावरणपूरक शहर घडविण्याचा संकल्प असल्याचे महापौर लांडगे यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु