
छत्रपती संभाजीनगर, 19 जून (हिं.स.)।
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत एप्रिल ते जुलै २०२६ या कालावधीतील २३ वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २० जून २०२६ रोजी पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर येथून वितरित करण्यात येणार आहे.या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने २० जून हा दिवस देशभरात ‘पीएम किसान उत्सव दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्नाचा आधार मिळावा या उद्देशाने केंद्र शासनाने फेब्रुवारी २०१९ पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे.या योजनेनुसार पात्र शेतकरी कुटुंबांना (पती, पत्नी व १८ वर्षांखालील अपत्ये) दरवर्षी तीन समान हप्त्यांमध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये, असे एकूण सहा हजार रुपये थेट आधार संलग्न बँक खात्यात जमा केले जातात.राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना यापूर्वीही या योजनेचा लाभ मिळालेला आहे.
योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी भूमी अभिलेख नोंदणी अद्ययावत करणे,बँक खाते आधारशी संलग्न करणे तसेच ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे.या तीनही अटींची पूर्तता केलेल्या शेतकरी कुटुंबांच्या आधार संलग्न बँक खात्यात २० जून रोजी थेट लाभ हस्तांतरणाद्वारे रक्कम जमा होणार आहे.
केंद्र शासनाने पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीकडे ‘फार्मर आयडी’ असणेही आवश्यक केले आहे.कृषी विज्ञान केंद्रे,जिल्हा,तालुका व ग्रामपंचायत स्तरावरील कार्यालये, कृषी उत्पन्न बाजार समित्या, संशोधन केंद्रे,शेतकरी उत्पादक कंपन्या (एफपीसी),शेतकरी उत्पादक संघटना (एफपीओ) तसेच प्राथमिक कृषी पतसंस्था (पीएसीएस) येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. नागरी सुविधा केंद्रांमधूनही कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणात सहभागी होता येणार आहे.
राज्यात कृषी विभाग,महसूल व वन विभाग तसेच ग्रामविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण https://pmindiawebcast.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis