चिपळूण येथे मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम
रत्नागिरी, 19 जून (हिं.स.) । मान्सून काळात उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्तींचा सामना करण्यासाठी प्रशासन किती सज्ज आहे, याची चाचपणी करण्यासाठी चिपळूणमध्ये गोवळकोट धक्का येथे आपत्ती व्यवस्थापनाची मान्सूनपूर्व रंगीत तालीम यशस्वीरीत्या पार पडली. जिल्हाधिकार
चिपळूण येथे मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम


रत्नागिरी, 19 जून (हिं.स.) । मान्सून काळात उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्तींचा सामना करण्यासाठी प्रशासन किती सज्ज आहे, याची चाचपणी करण्यासाठी चिपळूणमध्ये गोवळकोट धक्का येथे आपत्ती व्यवस्थापनाची मान्सूनपूर्व रंगीत तालीम यशस्वीरीत्या पार पडली.

जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या निर्देशानुसार आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात विविध विभागांच्या यंत्रणांनी तत्पर प्रतिसाद देत आपली सज्जता दाखवून दिली.

यादरम्यान गोवळकोट धक्का येथे एक व्यक्ती पाण्यात बुडाल्याची माहिती तहसीलदार कार्यालय व नगरपालिकेच्या नियंत्रण कक्षातून संबंधित विभागांना दूरध्वनीद्वारे देण्यात आली. हा संदेश मिळताच महसूल, पोलीस, आरोग्य, अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी आवश्यक साहित्यांसह काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले.

सर्व यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्यानंतर ही प्रत्यक्ष दुर्घटना नसून मान्सूनपूर्व तयारीचा भाग म्हणून आयोजित करण्यात आलेली रंगीत तालीम असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तातडीच्या संदेशावर सर्व विभागांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.

यानंतर उपस्थितांना बचाव कार्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बोटी व साहित्याची माहिती देण्यात आली. लाइफ जॅकेटचा योग्य वापर, पाण्यात बुडालेल्या व्यक्तीला बाहेर काढल्यानंतर देण्यात येणारे प्रथमोपचार तसेच पूर व अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक आपत्तींच्या वेळी घ्यावयाची काळजी आणि उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या रंगीत तालमीत तहसीलदार कार्यालय, मंडळ अधिकारी गोवळकोट, चिपळूण पालिकेचे अग्निशमन दल, रेस्क्यू बोट पथक, तालुका आरोग्य विभागाचे डॉक्टर व कर्मचारी, सुसज्ज रुग्णवाहिका, पोलीस विभाग, स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्राम महसूल अधिकारी तसेच 'आपदा मित्र' स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग घेतला.

मान्सूनच्या काळात कोणतीही आपत्ती उद्भवल्यास प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी यावेळी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande