
सोलापूर, 19 जून (हिं.स.)।
सोशल मीडियावर रिल्सच्या माध्यमातून लोकप्रिय झालेल्या रिल स्टार रोहिणी पाराध्ये यांच्या आत्महत्या प्रकरणात तब्बल २३ दिवसांनंतर मोठे वळण आले आहे. रोहिणीच्या मृत्यूला जबाबदार धरत तिचा पती निलेश पाराध्ये याच्याविरुद्ध मंगळवेढा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२६ मे रोजी रोहिणी पाराध्ये यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेने सोशल मीडिया विश्वात मोठी खळबळ उडाली होती. सुरुवातीला ही घटना आकस्मिक मानली जात होती, मात्र नंतर प्रकरणाला गंभीर वळण मिळाले.
मृत रोहिणीचे वडील बाळू शिवशरण यांनी दिलेल्या फिर्यादीत पती निलेश पाराध्ये याच्यावर शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या छळाला कंटाळून रोहिणी यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे.
या तक्रारीच्या आधारे मंगळवेढा पोलिसांनी निलेश पाराध्येविरुद्ध BNS कलम १०८, ११५(२), ३५२ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नागेश बनकर करत आहेत.
रोहिणी पाराध्ये यांच्या अकाली निधनामुळे चाहत्यांमध्ये शोककळा पसरली असून, पोलीस तपासात छळाच्या आरोपांची सत्यता लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड