
सोलापूर, 19 जून (हिं.स.)।
मॉन्सून राज्यात दाखल झाला असला तरी सोलापूर जिल्ह्यात अद्याप अपेक्षित पावसाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे धरणे व तलावांमधील जलसाठ्यात नव्याने वाढ झालेली नसून उपलब्ध पाणी मुख्यतः मागील हंगामातील शिल्लक साठ्यावरच अवलंबून आहे. जिल्ह्याची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या उजनी धरणात सध्या उणे २४.३७ टक्के इतका पाणीसाठा आहे, तर गेल्या वर्षी १८ जून रोजी याच धरणात ५४.७५ टक्के पाणीसाठा नोंदवला गेला होता.
जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पांत सध्या सरासरी केवळ ३३.३३ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. पावसाअभावी पाणीस्थिती चिंताजनक बनत असून उपलब्ध साठ्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे.
यंदा जूनच्या मध्यापर्यंतही मॉन्सूनचा प्रभावी पाऊस न झाल्याने उजनीसह इतर प्रकल्पांतील पाणीसाठ्यात घट दिसून येत आहे. गतवर्षी मे महिन्यापासूनच अवकाळी पाऊस सुरू झाला होता आणि मॉन्सूनही चांगला झाल्याने परिस्थिती तुलनेने चांगली होती. त्या वेळी १७ जून रोजी उजनी धरणात ५०.७९ टक्के पाणीसाठा होता.
सध्या जिल्ह्यातील सातही मध्यम प्रकल्पांत एकूण २.४१ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा असून तो ३३.३३ टक्के इतका आहे. तर गतवर्षी याच काळात हा साठा ५.४२ टीएमसी (सुमारे ७५ टक्के) इतका होता.
दरम्यान, एकरूख आणि आष्टी तलावात तुलनेने समाधानकारक पाणीसाठा आहे, तर पिंपळगाव ढाळे प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा उणे ८.५२ टक्क्यांवर पोहोचला आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील जलस्रोतांवर ताण वाढत असून पाणी बचतीचे आवाहन करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड