जालना - बदनापूर येथे रेशीम शेती कार्यशाळा उत्साहात
जालना, 19 जून (हिं.स.) :जालना जलकवच अभियान-2026 आणि आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत पंचायत समिती सभागृह, बदनापूर येथे रेशीम शेती विषयक कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. जलसुरक्षा, पीक विविधीकरण आणि शेतकरी उत्पन्नवाढ या उद्दिष्टांना केंद्रस्थानी ठेव
जालना - बदनापूर येथे रेशीम शेती कार्यशाळा उत्साहात


जालना, 19 जून (हिं.स.) :जालना जलकवच अभियान-2026 आणि आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत पंचायत समिती सभागृह, बदनापूर येथे रेशीम शेती विषयक कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. जलसुरक्षा, पीक विविधीकरण आणि शेतकरी उत्पन्नवाढ या उद्दिष्टांना केंद्रस्थानी ठेवून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

एल-निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या जालना जलकवच अभियानांतर्गत कमी पाण्यावर आधारित आणि शाश्वत उत्पन्न देणाऱ्या पर्यायी शेती व्यवसायांचा प्रसार करण्यावर भर दिला जात आहे.

या कार्यशाळेत तालुक्यातील शेतकरी, शेतकरी गट, महिला बचत गट सदस्य, उमेद अभियानातील महिला, कृषी सखी तसेच युवक-युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक रेशीम विकास अधिकारी अजय मोहिते यांनी रेशीम शेतीचे आर्थिक महत्त्व, तुती लागवड, रेशीम किडे संगोपन, शासकीय अनुदान योजना आणि बाजारपेठ उपलब्धतेबाबत माहिती दिली.

केंद्रीय रेशीम बोर्डाचे डॉ. अंकुश गाडगे यांनी तांत्रिक बाबी, उत्पादन व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबाबत मार्गदर्शन केले.

गट विकास अधिकारी ज्योती एन. राठोड यांनी जलकवच अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या सप्त कार्यक्रमांची माहिती देत महिलांनी रेशीम शेतीसारख्या शाश्वत शेतीकडे वळून उत्पन्न वाढवावे, असे आवाहन केले.

कार्यक्रमात रेशीम शेती ही कमी पाण्यात अधिक उत्पादन देणारी, ग्रामीण भागात रोजगार निर्मितीस चालना देणारी आणि महिलांसाठी उपयुक्त व्यवसायाभिमुख शेती पद्धती असल्याचे अधोरेखित करण्यात आले.

“कमी पाण्यात अधिक उत्पादन – रेशीम शेतीकडे वाटचाल” या संदेशाद्वारे शेतकऱ्यांना जलसाक्षरता आणि पर्यायी शेती व्यवसायाबाबत जागरूक करण्याचा प्रयत्न या कार्यशाळेतून करण्यात आला.

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन पंचायत समिती बदनापूर, उमेद अभियान, कृषी विभाग आणि रेशीम विभाग यांच्या समन्वयातून करण्यात आले.

--------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande