सोलापुरात उष्णतेचा कहर; शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याची मागणी
सोलापूर, 19 जून (हिं.स.)। सोलापूरमध्ये १५ ते १८ जूनदरम्यान हवामान उष्ण आणि कोरडे राहिले असून, जून महिन्यात शाळा सुरू झाल्यापासून कमाल तापमान ३७ ते ३९ अंश सेल्सिअसदरम्यान नोंदवले जात आहे. या पार्श्वभूमीवर शाळा सकाळच्या सत्रात भरवाव्यात, अशी मागणी श
School News Solpaur


सोलापूर, 19 जून (हिं.स.)।

सोलापूरमध्ये १५ ते १८ जूनदरम्यान हवामान उष्ण आणि कोरडे राहिले असून, जून महिन्यात शाळा सुरू झाल्यापासून कमाल तापमान ३७ ते ३९ अंश सेल्सिअसदरम्यान नोंदवले जात आहे. या पार्श्वभूमीवर शाळा सकाळच्या सत्रात भरवाव्यात, अशी मागणी शिक्षक व मुख्याध्यापक संघटनांनी शिक्षण विभागाकडे केली आहे. या संदर्भात चर्चा सुरू असून लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती माध्यमिक शिक्षण संचालकांनी दिली आहे.

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी शाळा १५ जूनपासून सुरू झाल्या आहेत. मात्र यंदा मॉन्सूनचे आगमन विलंबाने झाल्यामुळे सोलापूरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान ३७ अंशांपर्यंत कायम आहे. ग्रामीण भागातील अनेक शाळा पत्र्याच्या इमारतींमध्ये भरत असल्याने आणि ‘महावितरण’कडून लोडशेडिंग सुरू असल्याने विद्यार्थ्यांना व शिक्षकांना वर्गात बसणे कठीण होत आहे.

वाढत्या उष्णतेमुळे उष्माघात, निर्जलीकरण आणि इतर आरोग्य समस्या उद्भवण्याची भीती शिक्षक संघटनांनी व्यक्त केली आहे. तसेच ग्रामीण भागात पाणीटंचाईची समस्या असल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे.

या परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेचा विचार करून ३० जूनपर्यंत शाळा सकाळच्या सत्रात भरवाव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाने केली आहे. या मागणीवर माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी सांगितले की, संघटनांच्या सूचनांवर चर्चा सुरू असून लवकरच निर्णय जाहीर केला जाईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande