देवस्थान भूमी संरक्षण परिषदेला उत्स्फूर्त प्रतिसाद
मंदिरांच्या हक्कांसाठी संघटित लढ्याचा निर्धार अमरावती, 19 जून (हिं.स.) : मंदिरांवरील आघात रोखणे, मंदिर संस्कृतीचे संरक्षण करणे आणि देवस्थानांच्या जमिनी वाचवणे या उद्देशाने अमरावती येथे ‘देवस्थान भूमी संरक्षण परिषदेचे’ यशस्वी आयोजन करण्यात आले. महा
मंदिर सरकारीकरण, वक्फ बोर्डाच्या अतिक्रमणाविरोधात लढा तीव्र होणार:अमरावतीत देवस्थान भूमी संरक्षण परिषदेचे आयोजन


मंदिरांच्या हक्कांसाठी संघटित लढ्याचा निर्धार

अमरावती, 19 जून (हिं.स.) : मंदिरांवरील आघात रोखणे, मंदिर संस्कृतीचे संरक्षण करणे आणि देवस्थानांच्या जमिनी वाचवणे या उद्देशाने अमरावती येथे ‘देवस्थान भूमी संरक्षण परिषदेचे’ यशस्वी आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने राजापेठ येथील श्री रामदेवजी बाबा मंदिर सभागृहात ही परिषद पार पडली.

परिषदेला विदर्भातील 150 हून अधिक प्रमुख मंदिरांचे विश्वस्त, प्रतिनिधी तसेच शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून खासदार डॉ. अनिल बोंडे, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट, देवस्थान सेवा समितीचे राज्य पदाधिकारी अनूप जयस्वाल आणि विदर्भ समन्वयक श्रीकांत पिसोळकर उपस्थित होते.

परिषदेत मार्गदर्शन करताना सुनील घनवट यांनी सरकारने 3 मे रोजी सादर केलेले इनाम निर्मूलन प्रारूप 13 जून रोजी स्थगित केल्याचा उल्लेख करत हा हिंदू समाजाच्या संघटित शक्तीचा विजय असल्याचे सांगितले. मंदिर महासंघामुळे मंदिर विश्वस्तांमध्ये मजबूत संघटन निर्माण झाले असून, एका मंदिराची समस्या ही संपूर्ण हिंदू समाजाची समस्या मानून लढण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

देशातील सुमारे चार लाख मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करण्यासाठी संघटित प्रयत्न सुरू राहतील, असा विश्वास व्यक्त करताना त्यांनी वक्फ बोर्डाने बेकायदेशीरपणे बळकावलेल्या मंदिरांच्या जमिनी मुक्त करणे हा महासंघाचा पुढील महत्त्वाचा लढा असेल, असेही स्पष्ट केले.

खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी मंदिर सुरक्षेच्या मुद्द्यावर विशेष भर देत मंदिरे केवळ पूजा-अर्चेपुरती मर्यादित न राहता समाजोपयोगी उपक्रमांची केंद्रे बनली पाहिजेत, असे मत व्यक्त केले. तरुणांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्ग, व्यायामशाळा आणि गोशाळा यांसारखे उपक्रम मंदिरांच्या माध्यमातून राबविण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच, लोकप्रतिनिधी म्हणून मंदिरांशी संबंधित मागण्या शासनापर्यंत पोहोचवून न्याय मिळवून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

प्रास्ताविकात श्रीकांत पिसोळकर यांनी मंदिरे ही केवळ धार्मिक विधींची स्थळे नसून सनातन धर्माचा प्रचार आणि संस्कृती रक्षणाची प्रभावी केंद्रे बनली पाहिजेत, असे प्रतिपादन केले.

या परिषदेला अंबादेवी संस्थानचे ॲड. राजेंद्र पांडे, पिंगळादेवी संस्थानचे विनीत पाकोडे यांच्यासह अनेक मान्यवर विश्वस्त आणि पदाधिकारी उपस्थित होते. परिषदेत मंदिरांचे संरक्षण, देवस्थान जमिनींचे संवर्धन आणि हिंदू धार्मिक संस्थांच्या हक्कांसाठी संघटित लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande