
पुणे, 19 जून, (हिं.स.)। स्वच्छता नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पिंपरी चिंचवड महापालिकेने धडक कारवाई मोहीम हाती घेतली असून, विविध भागांत केलेल्या कारवायांमधून ४४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. रस्त्यावर कचरा टाकणे, कचरा जाळणे, बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर करणे तसेच सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणे, अशा प्रकारांवर ही कारवाई करण्यात आली.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग आणि ग्रीन मार्शल पथकाने विविध भागांत तपासणी मोहीम राबविली.
रहाटणी-थेरगाव परिसरात सार्वजनिक रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या एका टेम्पोवर कारवाई करून पाच हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. विशेष तपासणीदरम्यान संबंधित वाहनातून कचरा टाकला जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
रावेत परिसरात एका व्यावसायिक आस्थापनाकडून कचरा जाळला जात असल्याचे आढळून आले. कचरा जाळल्यामुळे होणारे वायू प्रदूषण आणि त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम लक्षात घेऊन संबंधित आस्थापनास २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
दरम्यान, ‘क’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत आरोग्य निरीक्षक क्षितिज रोकडे व ग्रीन मार्शल पथकाने यांनी प्रभाग क्रमांक ८ मधील भाजी मंडई परिसरात विशेष मोहीम राबविली. या मोहिमेत बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे आणि अस्वच्छता करणे या प्रकारांवर कारवाई करण्यात आली. त्यातून १४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून सुमारे १० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. याशिवाय, प्लास्टिकबंदीचे उल्लंघन करणाऱ्या आणखी एका प्रकरणात पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला.
उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी कचरा उघड्यावर टाकणे अथवा जाळणे यामुळे पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे सांगितले. अशा प्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी महापालिका कठोर कारवाई करत असून नागरिकांनी स्वच्छता नियमांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु