
पुणे, 19 जून (हिं.स.)। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२६ अधिक पारदर्शक आणि गैरप्रकारमुक्त करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून यंदा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. या परीक्षेत प्रथमच चेहरा झाकणाऱ्या बुरखा, मास्क, दुपट्टा आणि टोपीसारख्या वस्तूंवर परीक्षा केंद्रांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. फेस रेकग्निशन आणि सीसीटीव्ही आधारित देखरेख प्रभावीपणे राबविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी दिली.
नीट परीक्षेतील पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर राज्य परीक्षा परिषदेने यंदा कडक उपाययोजना केल्या आहेत. २८ जून रोजी होणाऱ्या टीईटी परीक्षेसाठी राज्यभरातून ६ लाखांहून अधिक उमेदवार प्रविष्ट झाले आहेत.
प्रत्येक उमेदवाराची बायोमेट्रिक नोंद, फेस रेकग्निशन आणि ओळखपत्र पडताळणी केली जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण चेहरा स्पष्ट दिसणे अनिवार्य करण्यात आले असून, ओळख पटविण्यात अडचण येत असल्यास संबंधित उमेदवाराला चेहरा झाकणारे वस्त्र काढावे लागेल.
परीक्षा केंद्रांवर मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी, एआय-आधारित सीसीटीव्ही देखरेख आणि थेट नियंत्रण कक्षातून सतत निरीक्षण केले जाणार आहे. मोबाइल, स्मार्टवॉच आणि कॅल्क्युलेटर यांसारखी इलेक्ट्रॉनिक साधने नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
तसेच प्रश्नपत्रिकेच्या प्रत्येक पानावर युनिक क्रमांक आणि क्यूआर कोड देण्यात येणार असून, कोणताही गैरप्रकार आढळल्यास तत्काळ फौजदारी कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे यंदाची टीईटी परीक्षा राज्यातील सर्वात कडक सुरक्षा व्यवस्थेत पार पडणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु