
अमरावती, 19 जून (हिं.स.) : अमरावतीच्या राजापेठ परिसरातील अंडरपासनजीकच्या अतिधोकादायक इमारतीचा शिकस्त भाग महापालिकेच्या बांधकाम विभागाने अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या साहाय्याने पाडला. यामुळे या इमारतीलगतच्या रस्त्यावरील धोका टळला आहे. तथापि इमारत मालकाने ही इमारत पाडून टाकण्याची नोटीस महापालिकेने यापूर्वीच बजावली असली तरी घरमालक व भाडेकरी यांच्या वादामुळे ती अमलात आलेली नाही.
गोदावरीबाई झाडे यांच्या मालकीची साधारणतः शंभर वर्षे जुनी दुमजली इमारत असून ती सध्या शिकस्त झाल्याने अतिधोकादायक श्रेणीत आली आहे. महापालिकेने घरमालकांस ही इमारत पाडून टाकण्यासाठी वारंवार नोटीस दिली असली तरी भाडेकरूंसोबत असलेल्या वादामुळे ती जीर्णावस्थेत आहे. या इमारतीच्या वरच्या मजल्यावरील भाग अतिशिकस्त झाला होता व तो कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता निर्माण झाली होती. यामुळे सार्वजनिक नुकसानीची शक्यता लक्षात घेता महापालिकेने आज या इमारतीचा शिकस्त भाग तोडला. शाखा अभियंता लक्ष्मण पावडे व उपअभियंता दिनेश हंबर्डे यांच्या नेतृत्वात अतिक्रमण विभागाचे योगेश कोल्हे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी