अमरावती जिल्ह्यात २८ जूनला पल्स पोलिओ मोहीम
अमरावती, 19 जून (हिं.स.) राष्ट्रीय पल्सपोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत २८ जून रोजी जिल्ह्यातील पाच वर्षांखालील एक लाख ४५ हजार ५४० बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्यात येणार आहेत. मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाभरात ३, ०५१ क्षेत्रीय पथके आणि
दोन थेंब आयुष्याचे; जिल्ह्यात २८ जूनला पल्स पोलिओ मोहीम


अमरावती, 19 जून (हिं.स.) राष्ट्रीय पल्सपोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत २८ जून रोजी जिल्ह्यातील पाच वर्षांखालील एक लाख ४५ हजार ५४० बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्यात येणार आहेत. मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाभरात ३, ०५१ क्षेत्रीय पथके आणि ६९९ पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहेत.

ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक पात्र बालकापर्यंत लसीकरण सेवा पोहोचविण्यासाठी आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समन्वयातून व्यापक नियोजन करण्यात आले आहे. स्थलांतरित व प्रवासी कुटुंबांतील बालकांसाठी २२५ ट्रान्झिट टिम्स कार्यरत राहणार आहेत. मेळघाटातील धारणी व चिखलदरा या दुर्गम भागांसह वीटभट्ट्यांवरील बालकांपर्यंत पोहोचण्यासाठी १८१ मोबाईल टिम्स तयार करण्यात आल्या आहेत. शहरातील बेघर बालकांच्या लसीकरणासाठी विशेषतः सहा नाइट टिम्सची नियुक्ती करण्यात आली आहे.

शीतसाखळी व्यवस्थेवर भर जिल्ह्यातील ६९ आरोग्य संस्थांमार्फत लसींची शीतसाखळी राखण्यासाठी ७, ७४१ आइस पॅक्स आणि १, ४७० व्हॅक्सिन कॅरिअर्सची व्यवस्था करण्यात आली आहे. मोहिमेवर १८५ वैद्यकीय अधिकारी आणि ६८ जिल्हास्तरीय अधिकारी प्रत्यक्ष देखरेख ठेवणार आहेत.

मेळघाटासारख्या दुर्गम भागातील तसेच वीटभट्ट्या व बांधकामस्थळांवरील एकही बालक लसीकरणापासून वंचित राहता कामा नये. सर्व विभागांनी समन्वयाने काम करून या मोहिमेला लोकचळवळीचे स्वरूप द्यावे. -आशिष येरेकर, जिल्हाधिकारी.पाच वर्षांखालील प्रत्येक बालकाला जवळच्या बूथवर नेऊन पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब नक्की द्यावेत. घरभेटीदरम्यान आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करून कोणतेही बालक वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी. -डॉ. प्रवीण पारिसे, जिल्हा आरोग्य अधिकारी.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande