रत्नागिरी : दुर्लक्षित घटकाचे दुःख मांडणे हेच लेखक-कलावंताचे काम - पवन भगत
रत्नागिरी, 19 जून (हिं.स.) । समाजातील दुर्लक्षित घटकाचे दुःख मांडणे हेच खऱ्या लेखकाचे, कलावंताचे काम आहे, असे प्रतिपादन लेखक पवन भगत यांनी केले. पवन भगत यांनी येथील नवनिर्माण शिक्षण संस्थेला भेट दिली. त्या प्रसंगी त्यांची मुलाखत घेण्यात आली. त्यां
रत्नागिरी : दुर्लक्षित घटकाचे दुःख मांडणे हेच लेखक-कलावंताचे काम - पवन भगत


रत्नागिरी, 19 जून (हिं.स.) । समाजातील दुर्लक्षित घटकाचे दुःख मांडणे हेच खऱ्या लेखकाचे, कलावंताचे काम आहे, असे प्रतिपादन लेखक पवन भगत यांनी केले.

पवन भगत यांनी येथील नवनिर्माण शिक्षण संस्थेला भेट दिली. त्या प्रसंगी त्यांची मुलाखत घेण्यात आली. त्यांचे लेखन, समाजाविषयीची जबाबदारी, चळवळीतील काम, साहित्याचे समाजातील स्थान आणि त्यांच्या कादंबरीसंदर्भात झालेला वाद या सर्व विषयांवर त्यांनी मोकळेपणाने विचार मांडले.

करोनातील टाळेबंदीच्या काळात स्थलांतरित मजूरवर्गाची होरपळ मांडण्याचा माणूस म्हणून प्रयत्न केला त्यातून 'ते पन्नास दिवस' ही कादंबरी आकारास आली, असे त्यांनी सांगितले. करोना महामारीच्या काळात भारताच्या विविध महानगरांत स्थलांतरित मजुरांचे झालेले हाल अत्यंत वेदनादायी होते. ती वेदना कमी करण्यासाठी अस्वस्थ मनाने मी कादंबरी लिहिली. त्यातून पैसे मिळवणे हा हेतू नव्हता तर मला ती माझी कलावंत म्हणून नैतिक जबाबदारी वाटली.

पवन भगत यांची 'ते पन्नास दिवस' कादंबरी अमरावती विद्यापीठात अभ्यासक्रमात होती पण देशविरोधी म्हणून ती अभ्यासक्रमातून वगळण्यात आली. त्यावर न्यायालयात दाद मागण्यात आली आणि न्यायालयाने ती पुन्हा अभ्यासक्रमात घेण्याचा निर्णय दिला. यावरून या कादंबरीवर बरीच चर्चा झाली. त्याबद्दल बोलताना भगत म्हणाले, अभ्यासक्रमात ती असावी म्हणून मी ती लिहिली नव्हती. त्यामुळे व्यक्तिगत मला काही फरक पडत नाही, पण ज्या कारणाने ती काढून टाकण्यात आली तो अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध आणण्याचा प्रयत्न वाटतो आणि तो भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने घातक आहे. मी माझ्या कादंबरीचे अनेक भाग कोणत्याही हक्काशिवाय अनेकांना वापरण्यासाठी दिले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि कादंबरीकार पवन भगत यांची मुलाखत प्रा. अश्विनी कांबळे यांनी घेतली. अध्याक्षीय मनोगत कनिष्ठ महाविद्यालय विभाग प्रमुख सुकुमार शिंदे यांनी केले. याप्रसंगी नवनिर्माण हायचे मुख्याध्यापक उल्हास सप्रे यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande