
नांदेड, 19 जून (हिं.स.)।
किनवट जिल्हा व मांडवी, ईस्लापूर तालुक्याची मागणी जुनी असून या मागणीसाठी झालेल्या प्रत्येक आंदोलनात आपला सहभाग आहे. शासनाने किनवटला अप्पर जिल्हाधिकारी व ईस्लापुरसाठी अप्पर तहसील कार्यालयाला मंजुरी दिली पण पाठपुराव्या अभावी व तांत्रिक समस्येमुळे मांडवी अप्पर तहसील कार्यालयाचे मंजुरी रखडली असून येत्या अधिवेशन काळात आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व महसूल मंत्र्यांना भेटून हा प्रश्न सोडवू असे भरीव आश्वासन आ. भिमराव केराम यांनी दिले. मांडवीसाठी अप्पर तहसील कार्यालयाला मंजुरी मिळवून द्यावी या मागणीसाठी मांडवीचे सरपंच सुमनबाई पेंदोर, गजानन बंडेवार, बजरंगरेड्डी सिंगडवार, प्रवीण श्रीमनवार, दिनेश रुणवाल, पत्रकार अमोल राठोड, शिरपूरचे उपसरपंच गजानन भुरे, शेखररेड्डी येल्टीवार, सावन राठोड, गजानन बावणे, शेखर राठोड, साकेत पठाण, शेखर श्रीमनवार, योगेश दुबे, पत्रकार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील श्रीमनवार यांचे शिष्टमंडळ आ. भिमरावजी केराम यांना भेटले असता त्यांनी आश्वासन दिले. भौगोलिक व राजकीय दृष्ट्या मांडवीला अप्पर तहसील कार्यालया झाल्यास गोरगरिबांना किनवट येण्याची गरज राहणार नाही. त्यामुळे वेळ आणि पैसाही वाचेल. अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपळशेंडा मोहाडा, खंबाळा, पारडी, गोलापेठ सारख्या दूरच्या गावांतील शेतकऱ्यांना व विद्यार्थ्यांना सोयीचे होईल त्यामुळे मांडवीला अप्पर तहसील कार्यालय होणे नितांत गरजेचे आहे याची आपल्याला जाणीव असल्याचेही त्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis