
छत्रपती संभाजीनगर, 19 जून (हिं.स.)।
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,महाराष्ट्र शासन,समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद धाराशिव,यश मेडिकल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच के.टी.पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग,धाराशिव यांच्या सहकार्याने आयोजित नशामुक्त भारत अभियानाचा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात के.टी. पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग येथे संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी के.टी.पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगचे प्राचार्य डॉ.गजानंद वाले हे होते.प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
प्रास्ताविकात जिल्हा समाज कल्याण अधिकारी सचिन कवले यांनी नशामुक्त भारत अभियानाची उद्दिष्टे, व्यसनमुक्तीबाबत शासनाच्या विविध योजना तसेच समाजातील सर्व घटकांच्या सहभागाचे महत्त्व विशद केले.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ.संदीप तांबारे यांनी व्यसनांचे दुष्परिणाम, युवकांवरील त्याचा परिणाम तसेच व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी सामूहिक प्रयत्नांची गरज याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांनी आपल्या मनोगतात युवकांनी व्यसनांपासून दूर राहून शिक्षण, कौशल्य विकास आणि राष्ट्रनिर्मितीत सक्रिय योगदान द्यावे,असे आवाहन केले.तसेच नशामुक्त भारत अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदविण्याचेही त्यांनी आवाहन केले.
यावेळी उपस्थित विद्यार्थी,प्राध्यापक, अधिकारी,कर्मचारी आणि नागरिकांनी नशामुक्तीची शपथ घेतली.व्यसनाला नकार,निरोगी जीवनाला स्वीकार हा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
अध्यक्षीय समारोपात डॉ.गजानंद वाले यांनी व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी शैक्षणिक संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले.तसेच अशा जनजागृतीपर उपक्रमांचे स्वागत करून विद्यार्थ्यांनी या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा,असे आवाहन केले.
या कार्यक्रमास सनम लामकाने,अमोल कातंगले यांच्यासह समाजकल्याण विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमात २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
समाजकल्याण विभाग,यश मेडिकल फाऊंडेशन आणि के.टी.पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग यांच्या संयुक्त प्रयत्नांतून या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis