
रत्नागिरी, 19 जून (हिं.स.) । आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या स्थितीमुळे नवीन घरगुती एलपीजी गॅसजोडण्या तूर्त बंद करण्यात आल्या असून जुन्या ग्राहकांना नियमित पुरवठा होणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत यांनी दिली.
त्या म्हणाल्या, नव्या जोडण्या देण्याची प्रक्रिया सध्या संपूर्ण राज्यभरात बंद आहे. गॅस कंपन्यांना या संदर्भात थेट शासनाकडूनच निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हा पुरवठा विभागाकडून प्रमाणशीर वितरणाच्या दृष्टीने वेळोवेळी गॅस एजन्सींना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.
आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यभरात घरगुती व व्यावसायिक सिलिंडरच्या वापरावर शासनाकडून काही निर्बंध घालण्यात आले होते. या संकटकाळात सर्वसामान्य नागरिकांना सिलिंडरचा तुटवडा भासू नये आणि सिलिंडरचे वाटप योग्य प्रमाणात व्हावे, यासाठी शासनाने एक महत्त्वपूर्ण नियम लागू केला आहे. त्यानुसार ग्राहकांसाठी दोन सिलिंडरच्या बुकिंगमध्ये ठराविक दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
नवीन गॅस जोडण्यांवर तात्पुरती बंदी असली, तरी जुन्या आणि नियमित ग्राहकांना नियमित पुरवठा होणार आहे. गॅस कंपन्यांना या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश आहेत. गेल्या मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यात नियमित सिलिंडरची पुरेशी आवक होत आहे. त्यामुळे सध्याच्या ग्राहकांना पुरवठा सुरळित ठेवण्यास मदत होत आहे.
गॅस वितरणात पारदर्शकता आणि समतोल राखण्यासाठी जिल्हा पुरवठा विभाग सातत्याने गॅस एजन्सींच्या संपर्कात असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, असेही जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी