
पुणे, 19 जून, (हिं.स.)। पुणे शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर घोरपडी परिसरातील भीमनगरमध्ये पाणीटंचाईची समस्या अधिक गंभीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी येथील महिलांनी रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
भीमनगर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या कायम असून, नागरिकांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा मिळत नसल्याच्या तक्रारी सातत्याने करण्यात येत आहेत. यापूर्वीही स्थानिक नागरिकांनी आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. मात्र, त्यावेळी दिलेली आश्वासने प्रत्यक्षात पूर्ण न झाल्याने समस्या अद्याप कायम असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली असून, महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः घरगुती काम करणाऱ्या महिलांवर याचा थेट परिणाम होत असून, पाणीटंचाईमुळे त्यांच्या कामावर जाण्यातही अडथळे निर्माण होत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु