
पुणे, 19 जून (हिं.स.)। भारतीय हवामान विभागाने जुलै महिन्यात पुणे शहर आणि धरण क्षेत्रात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी केले आहे.
पाण्याच्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी आयुक्तांनी शिवाजीनगर येथील भारतीय हवामान विभागाच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी हवामान शास्त्रज्ञांसोबत पावसाच्या संभाव्य अंदाजाबाबत सविस्तर चर्चा केली. जुलै महिन्यात दमदार पाऊस अपेक्षित असल्याने नागरिकांनी भीती बाळगू नये, मात्र पाण्याचा वापर जपून आणि काटकसरीने करावा, असे आवाहन त्यांनी केले.
महापालिकेच्या नियमांनुसारच पाण्याचा वापर करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करत, पाण्याचा अपव्यय किंवा गैरवापर केल्यास कठोर दंडात्मक कारवाईसह कायदेशीर गुन्हे दाखल केले जातील, असा इशाराही आयुक्तांनी दिला.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्राजित नायर, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनुने तसेच हवामान विभागाचे विभागीय प्रमुख साई कृष्णन आणि इतर वरिष्ठ शास्त्रज्ञ उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु