
सोलापूर, 19 जून (हिं.स.)। दिनांक 23 जून 1894 रोजी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना झाल्याच्या स्मरणार्थ दरवर्षी 23 जून हा दिवस जगभर जागतिक ऑलिम्पिक दिन म्हणून साजरा केला जातो. खेळाडूंमध्ये क्रीडाभावना, उत्कृष्टतेचा ध्यास, सहभागाची प्रेरणा आणि निरोगी जीवनशैलीचा प्रसार करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.
या पार्श्वभूमीवर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सोलापूर व स्वामी विवेकानंद हायस्कूल, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दि. 23 जून 2026 रोजी सायंकाळी 4.30 वाजता स्वामी विवेकानंद हायस्कूल (एमआयडीसी), सोलापूर येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात जिल्ह्यातील शिवछत्रपती पुरस्कार विजेते, आंतरराष्ट्रीय खेळाडू तसेच त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात येणार असून, मान्यवरांच्या उपस्थितीत क्रीडा क्षेत्रातील अनुभवांवर आधारित चर्चासत्राचे आयोजनही करण्यात आले आहे.
तसेच जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, विविध क्रीडा संघटना, एनसीसी, मेरा युवा भारत अभियान, सामाजिक संस्था तसेच औद्योगिक प्रतिष्ठानांनी जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त विविध क्रीडा व जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करावे. आयोजित उपक्रमांचा अहवाल व छायाचित्रे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास सादर करावीत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश मोहारे यांनी केले आहे.
या कार्यक्रमास खेळाडू, पुरस्कार विजेते, पालक, क्रीडा प्रशिक्षक व क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड