
लातूर, 02 जून, (हिं.स.)। धाराशिव, लातूर व बीड स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६ साठी वैध उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली असून एकूण ९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्षांकडून भारतीय जनता पक्षाने बसवराज माधवराव पाटील यांना उमेदवारी दिली आहे, तर इंडियन नॅशनल काँग्रेसकडून महेश माणिकराव देशमुख निवडणूक लढवत आहेत.
याशिवाय सात अपक्ष उमेदवारांनीही आपले अर्ज कायम ठेवले आहेत. त्यामध्ये अर्चना विनोद रंगणे, अहमद राज सय्यद नुर राज सय्यद, महालिंग मल्लिंद गणपती, शरद रामभाऊ यादव, सचिन भारतराव पवार, सहाल बिन आमेर चाऊस आणि संजय पांडुरंगजी मुंदडा यांचा समावेश आहे.
विधान परिषदेच्या या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता असली तरी अपक्ष उमेदवारांमुळे निवडणुकीत रंगत वाढली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारांवर या निवडणुकीचा निकाल अवलंबून असल्याने सर्वच पक्षांनी प्रचाराला वेग दिला आहे.
दरम्यान, उमेदवारी अर्जांची छाननी पूर्ण झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी वैध उमेदवारांची यादी जाहीर केली असून आता राजकीय घडामोडींना अधिक वेग येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis