
लातूर, 02 जून (हिं.स.) समाजाच्या सुरक्षेसाठी चोवीस तास कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांचे आरोग्य सुदृढ राहणे ही काळाची गरज असून, निरोगी पोलीस दल हे प्रभावी आणि सक्षम कायदा-सुव्यवस्थेचे आधारस्तंभ आहे. याच उद्देशाने पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या संकल्पनेतून जागतिक तंबाखूविरोधी दिनाच्या निमित्ताने इंडियन डेंटल असोसिएशन (आय.डी.ए.) लातूर शाखेच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर येथे विशेष मुख आरोग्य तपासणी व तंबाखूमुक्ती जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला पोलीस अधिकारी, अंमलदार व प्रशासकीय कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची मुख आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच तंबाखू, गुटखा, मावा आणि धूम्रपानाच्या व्यसनामुळे उद्भवणाऱ्या गंभीर आजारांबाबत जनजागृती करण्यात आली.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. श्रीराम बनसोडे यांनी तंबाखूजन्य पदार्थांमुळे होणारे ओरल सबम्युकस फायब्रोसिस (OSMF), ल्युकोप्लाकिया, मुखाचा कर्करोग यांसारख्या गंभीर आजारांची माहिती दिली. मुखातील लहानसहान बदल, जखमा किंवा पांढरे-लाल चट्टे यांकडे दुर्लक्ष न करता वेळेवर तपासणी करून उपचार घेणे किती महत्त्वाचे आहे, याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
उपक्रमादरम्यान तंबाखू अथवा इतर व्यसनांच्या आहारी गेलेल्या कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक समुपदेशन करण्यात आले. त्यांना व्यसनमुक्तीसाठी आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन, मानसिक आधार आणि आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारण्याबाबत माहिती देण्यात आली.
यावेळी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, पोलीस अधिकारी व कर्मचारी हे समाजाच्या सुरक्षेसाठी स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता अनेकदा कठीण परिस्थितीत कर्तव्य बजावत असतात. अशा परिस्थितीत त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. तंबाखू आणि तत्सम व्यसने केवळ व्यक्तीच्या आरोग्यावर परिणाम करत नाहीत, तर त्याच्या कार्यक्षमतेवर आणि कुटुंबाच्या जीवनावरही विपरीत परिणाम करतात. त्यामुळे प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याने तंबाखूमुक्त जीवनशैलीचा स्वीकार करून स्वतःच्या आरोग्याबरोबरच समाजासमोरही आदर्श निर्माण करावा.
लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आरोग्य संवर्धनासाठी अशा विविध उपक्रमांना सातत्याने प्रोत्साहन देण्यात येईल. त्यांनी आय.डी.ए. लातूर शाखेने राबविलेल्या या सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे विशेष कौतुक करत पोलीस दलाच्या आरोग्य संवर्धनासाठी दिलेल्या योगदानाबद्दल सर्व दंतचिकित्सकांचे आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या शेवटी आय.डी.ए. लातूर शाखेच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. तसेच समाजामध्ये तंबाखूमुक्तीचा संदेश पोहोचविण्यासाठी आणि आरोग्यविषयक जनजागृती वाढविण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली. हा उपक्रम केवळ आरोग्य तपासणीचा कार्यक्रम न ठरता पोलीस दलामध्ये आरोग्याविषयी सजगता, व्यसनमुक्तीची प्रेरणा आणि कर्करोग प्रतिबंधाबाबत जागरूकता निर्माण करणारा ठरला. समाजाच्या सुरक्षेबरोबरच पोलीस दलाच्या आरोग्य सुरक्षेलाही तितकेच महत्त्व असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis