
मुंबई, 02 जून (हिं.स.)। चंद्रपूर जिल्हा आणि यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेत तांत्रिक कारणांमुळे नाकारण्यात आलेल्या नुकसान भरपाई प्रकरणांची फेर तपासणी करून त्याबाबतचा अहवाल सादर करावा, अशा सूचना कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील तसेच यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पीकविमा प्रकरणांबाबत मंत्रालयात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस आमदार सुधीर मुनगंटीवार, कृषी सचिव परिमल सिंह, उपसचिव प्रतिभा पाटील तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
कृषी मंत्री भरणे म्हणाले की, राज्य शासनाने शेती आणि शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले असून प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या लाभापासून कोणताही पात्र शेतकरी वंचित राहू नये. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत तांत्रिक कारणांमुळे लाभांपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळणे आवश्यक आहे. पात्र लाभार्थ्यांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करून त्यांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाने विशेष प्रयत्न करावेत.
यानंतर झालेल्या बैठकीत गडचिरोली येथील झाडीपट्टी शेतकरी उत्पादक कंपनी, जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील लालवाडी येथील ग्रीन ॲम्बीशन शेतकरी उत्पादक कंपनी आणि शिवसुदर्शन शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या विविध समस्या व प्रलंबित बाबींचा आढावा घेण्यात आला. या शेतकरी कंपन्यांच्या अडचणी आणि समस्यांवर सकारात्मक मार्ग काढून आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचनाही कृषीमंत्री भरणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर