
रत्नागिरी, 2 जून, (हिं.स.) । रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणुकीसाठी दाखल झालेल्या सर्व सहा उमेदवारांचे १२ उमेदवारी अर्ज छाननीअंती वैध ठरले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी ही माहिती दिली. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा अंतिम दिवस ४ जून आहे.
या निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार जुईली महेंद्र दळवी यांनी ३० मे रोजी एक उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सुरेंद्रनाथ यशवंत माने यांनी चार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनिकेत सुनील तटकरे यांनी चार, शेकापचे अरविंद पुंडलिक म्हात्रे व मानसी संतोष म्हात्रे यांनी प्रत्येकी एक, तसेच अपक्ष उमेदवार अनिल रमेश चोपडा यांनी एक असे एकूण १२ अर्ज दाखल केले होते.
मंगळवारी सकाळी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात निवडणूक निरीक्षक अभय महाजन यांच्या उपस्थितीत अर्जांची छाननी करण्यात आली. यावेळी उपस्थित उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींना आक्षेप नोंदविण्याची संधी देण्यात आली. छाननीअंती सर्व १२ अर्ज वैध ठरविण्यात आले.
दरम्यान, शेकापच्या मानसी संतोष म्हात्रे यांचा अर्ज छाननीदरम्यान अपक्ष उमेदवार म्हणून ग्राह्य धरण्यात आला. छाननी प्रक्रियेला निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी