मेळघाट मधील गडगा नदीवरील पूल धोकादायक
कठडे बसवून नवीन पूल उभारण्याची नागरिकांची मागणी अमरावती, 02 जून (हिं.स.)। तालुक्यातील धारणी ते साद्राबाडी मार्गावरील गडगा नदीवरील पूल नागरिकांसाठी जीवघेणा ठरत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या पुलावर तत्काळ मजबूत कठडे बसवावेत तसेच पुलाची रुंदी
मेळघाट मधील गडगा नदीवरील पूल धोकादायक


कठडे बसवून नवीन पूल उभारण्याची नागरिकांची मागणी

अमरावती, 02 जून (हिं.स.)। तालुक्यातील धारणी ते साद्राबाडी मार्गावरील गडगा नदीवरील पूल नागरिकांसाठी जीवघेणा ठरत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या पुलावर तत्काळ मजबूत कठडे बसवावेत तसेच पुलाची रुंदी वाढवून नवीन पूल उभारण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

धारणी ते साद्राबाडी हा परिसरातील अनेक गावांना जोडणारा मुख्य मार्ग मानला जातो. साद्राबाडी, सुसदा आणि परिसरातील ग्रामस्थ, विद्यार्थी, शेतकरी तसेच व्यापारी मोठ्या प्रमाणात या रस्त्याचा वापर करतात. मात्र गडगा नदीवरील पूल अत्यंत अरुंद असल्याने दोन चारचाकी वाहनांना एकाच वेळी ये-जा करणे कठीण होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. विशेषतः पावसाळ्यात नदीला पूर आल्यावर आणि रात्रीच्या वेळी पुलावरून प्रवास करणे अत्यंत धोकादायक ठरत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पुलावर सुरक्षेसाठी कोणतेही मजबूत कठडे नसल्यामुळे वाहन थेट नदीत कोसळण्याची भीती कायम असते. यापूर्वीही दोन युवक पुलावरून पडून मृत्युमुखी पडल्याची घटना घडल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर संघटनेचे जिल्हाध्यक्ष धर्मा वानखडे यांनी प्रशासनाकडे तातडीने पुलाची पाहणी करण्याची मागणी केली आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंना मजबूत सिमेंट किंवा लोखंडी कठडे उभारावेत, धोकादायक ठिकाणी गतिरोधक लावावेत तसेच इशारा फलक बसवावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी पुलाची रुंदी वाढवून नवीन पूल उभारण्याचीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. दरम्यान, या निवेदनाच्या प्रती मेळघाटचे आमदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच धारणी तहसीलदार यांनाही देण्यात आल्या आहेत. प्रशासनाने या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेऊन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

--------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande