अमरावतीत जंगलात अर्धवट जळालेला अज्ञात युवतीचा मृतदेह आढळला; खुनाचा संशय
अमरावती, 2 जून (हिं.स.) । चांदूर रेल्वे मार्गावरील राजुरा बेडे परिसरातील जंगलात एका अज्ञात युवतीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासात अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आल्याचे संकेत मिळत असून या प्रकरणाचा तपास पोलिसा
राजूरा बेडे जंगलात युवतीचा जळालेला मृतदेह; सरिया खुपसून हत्या, प्रेमसंबंधाचा तपास सुरू


अमरावती, 2 जून (हिं.स.) । चांदूर रेल्वे मार्गावरील राजुरा बेडे परिसरातील जंगलात एका अज्ञात युवतीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासात अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आल्याचे संकेत मिळत असून या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत युवतीच्या पोटात लोखंडी सळई (सरिया) खुपसून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यानंतर ओळख पटू नये म्हणून मृतदेहावर पेट्रोल टाकून जाळण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

गुराख्याला आढळला मृतदेह

मंगळवारी दुपारी एका गुराख्याला जंगलातून दुर्गंधी येत असल्याचे जाणवले. शोध घेतल्यानंतर त्याला अर्धवट जळालेला मृतदेह दिसून आला. त्याने तात्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ओळख पटवण्याचा प्रयत्न

घटनेची माहिती सोशल मीडियावर पसरल्यानंतर टॉवर लाईन परिसरातील एक महिला घटनास्थळी पोहोचली. मृतदेहाजवळील अर्धवट जळालेल्या कपड्यांवरून आणि इतर वस्तूंवरून तिने मृत युवती आपल्या परिसरातील असल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे पोलिसांनी तपासाची दिशा त्या भागाकडे वळवली आहे.

उच्चस्तरीय तपास सुरू

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त राकेश ओला, उपायुक्त श्याम घुगे, गाडगेनगरचे ठाणेदार गोरखनाथ जाधव तसेच गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप चव्हाण यांनी फॉरेन्सिक तज्ज्ञ, डॉग स्क्वॉड आणि फिंगरप्रिंट पथकासह घटनास्थळी पाहणी केली.

पोलिसांनी प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे की, हत्या दुसऱ्या ठिकाणी करून पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जंगलात आणून जाळण्यात आला असावा.

विविध अँगलने तपास

या प्रकरणाचा तपास प्रेमसंबंध, कौटुंबिक वाद किंवा ऑनर किलिंगच्या दृष्टीनेही केला जात आहे. परिसरातील बेपत्ता महिलांची माहिती संकलित करण्यात येत असून ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली असून तपासाला गती देण्यात आली आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande