सोलापूरमध्ये काँग्रेस व न्यू राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवारांचे अर्ज अडचणीत; बोगस सह्यांचा आरोप
सोलापूर, 02 जून (हिं.स.) सोलापूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या नामनिर्देशन पत्रांच्या छाननी प्रक्रियेदरम्यान काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर आणि न्यू राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार अशोक वाघमोडे
gfd


सोलापूर, 02 जून (हिं.स.) सोलापूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या नामनिर्देशन पत्रांच्या छाननी प्रक्रियेदरम्यान काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर आणि न्यू राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार अशोक वाघमोडे यांच्या अर्जांवर गंभीर हरकती नोंदविण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

निवडणूक नियमांनुसार नामनिर्देशन पत्रासोबत किमान दहा मतदारांच्या सूचक म्हणून सह्या आवश्यक असतात. छाननीदरम्यान न्यू राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार अशोक वाघमोडे यांच्या नामनिर्देशन पत्रावर भारतीय जनता पक्षाशी संबंधित सहा मतदारांच्या सह्या असल्याचे निदर्शनास आले. मात्र या सह्या बनावट असल्याचा दावा करत भाजपने अधिकृत हरकत दाखल केली आहे. संबंधित सदस्यांची प्रतिज्ञापत्रेही हरकतीसोबत जोडण्यात आल्याची माहिती आहे.

दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांच्या नामनिर्देशन पत्राबाबतही आक्षेप नोंदविण्यात आला आहे. पंढरपूर येथील नगरसेवक नागेश भोसले यांनी स्वतःच्या नावावरील सूचकाची सही बनावट असल्याचा आरोप करत निवडणूक अधिकाऱ्यांकडे हरकत दाखल केली आहे.

या दोन्ही प्रकरणांमुळे संबंधित उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्रांच्या वैधतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. छाननी प्रक्रियेदरम्यान सादर झालेल्या हरकती, प्रतिज्ञापत्रे आणि अन्य पुराव्यांच्या आधारे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कार्तिकेयन अंतिम निर्णय देणार आहेत.दरम्यान, या निर्णयाचा निवडणुकीच्या राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, सर्वांचे लक्ष आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निकालाकडे लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande