रायगड - स्मार्ट मीटर बसविण्यात चौल-२ शाखेचा आदर्श; जिल्ह्यात पहिला मान
रायगड, 02 जून, (हिं.स.)। : अलिबाग महावितरणतर्फे राज्यभर स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम वेगाने सुरू असून रायगड जिल्ह्यातील अलिबाग-१ उपविभागांतर्गत चौल-२ शाखा कार्यालयाने उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्यातील पहिले १०० टक्के स्मार्ट मीटर बसविलेले शाखा का
Chaul-2 branch is exemplary in installing smart meters; First in the district


रायगड, 02 जून, (हिं.स.)। : अलिबाग महावितरणतर्फे राज्यभर स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम वेगाने सुरू असून रायगड जिल्ह्यातील अलिबाग-१ उपविभागांतर्गत चौल-२ शाखा कार्यालयाने उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्यातील पहिले १०० टक्के स्मार्ट मीटर बसविलेले शाखा कार्यालय होण्याचा मान मिळविला आहे. या शाखा कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील सर्व १,५७० वीज ग्राहकांचे मीटर स्मार्ट मीटरमध्ये रूपांतरित करण्यात आले आहे.

राज्यात स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेत कोंकण प्रादेशिक विभाग आघाडीवर असून आतापर्यंत ४३ लाख ३ हजारांहून अधिक स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. भांडुप परिमंडलाने १० लाखांहून अधिक स्मार्ट मीटर बसवून राज्यात दुसरे स्थान प्राप्त केले आहे. रायगड जिल्ह्यातील पेण मंडळ कार्यालयांतर्गत ४ विभाग, १७ उपविभाग आणि १०५ शाखा कार्यालये कार्यरत आहेत. यापैकी चौल-२ शाखा कार्यालयाने शंभर टक्के स्मार्ट मीटर बसविण्याचा टप्पा पूर्ण केला आहे.

स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना अचूक व पारदर्शक वीजबिल मिळत आहे. ग्राहकांना मोबाईल अॅपच्या माध्यमातून स्वतःचा वीज वापर तपासता येतो. तसेच सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीत वीज वापरल्यास घरगुती ग्राहकांना सवलतीचाही लाभ मिळत आहे. रायगड जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ३.४० लाख ग्राहकांना एकूण २.८३ कोटी रुपयांची वीजबिल सवलत देण्यात आली आहे.

स्मार्ट मीटर तंत्रज्ञानामुळे मीटर रीडिंगसाठी कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष घरी जाण्याची आवश्यकता राहत नाही. वीज वापराची माहिती रिअल-टाईममध्ये उपलब्ध होत असल्याने वीजपुरवठ्याचे नियोजन अधिक परिणामकारकपणे करता येते. तसेच वीज चोरी, मीटरमध्ये छेडछाड आणि बिलिंगमधील त्रुटी कमी होण्यास मदत होत आहे.

चौल-२ शाखा कार्यालयातील शाखा अभियंता देव्रत पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ग्राहकांमध्ये व्यापक जनजागृती व प्रबोधन करून ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली. अधीक्षक अभियंता धनराज बिक्कड आणि उपविभागीय अधिकारी तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम पूर्ण करण्यात आले. या यशाबद्दल भांडुप परिमंडलाचे मुख्य अभियंता संजय पाटील यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande